

छत्रपती संभाजीनगर : कल्पनाच्या संशयास्पद कृत्यांचा गुंता अधिकच वाढत चालला आहे. तिचा अफगाणिस्तानचा मित्र अशरफने हवालामार्फत पाकिस्तानात लाखो रुपये पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. कल्पनाच्या बँक खात्यात ३२ लाखांची संशयास्पद उलाढाल आणि शहरातील बिल्डर व दोन बड्या राजकीय नेत्यांकडे पैशाची मागणी झाल्याचे समोर आल्याने प्रकरणाला धक्कादायक आंतरराष्ट्रीय वळण मिळाले आहे.
अफगाणी मित्र अशरफचे हरियाणात लोकेशन सापडताच गुप्तचर यंत्रणानी धाव घेतली आहे. अफगाणिस्तन आणि पाकिस्तान कनेक्शन समोर आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी आयबीच्या सलग तीन दिवसांपासून सिडको पोलिस ठाण्यात तळ ठोकला आहे. तिची सातत्याने चौकशी केली जात आहे. तिच्या प्रत्येक उत्तरामागे नवे प्रश्न उभे राहत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तिची पोलिस कोठडी बुधवारी समाप्त होत असल्याने सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक योगेश गायकवाड तिला न्यायालयात हजर करून वाढीव पोलिस कोठडीची मागणी करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. पोलिस आयुक्तांसह उपायुक्त प्रशांत स्वामी या प्रकरणात बारकाईने लक्ष ठेवून आहेत. वेळेवेळी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे.
अशरफच्या भावाचे इस्लामाबादमध्ये रेस्टॉरंन्ट
कल्पनाचा अफगाणी मित्र अशरफ खील याचा भाऊ यामा अबिद याचे पाकिस्तानमध्ये पार्टनरशिपमध्ये रेस्टॉरंट आहे. तो आई आणि बहिणीसोबत तिथे राहतो. त्यावर तेथील प्रशासनाने कारवाई करून उद्ध्वस्त केले होते. त्यावेळी त्याला मदत करण्यासाठी कल्पनाने ३ लाखपरुये अशरफकडे दिले होते. त्याने दिल्ली येथेच राहणाऱ्या अफगाणी मित्रामार्फत हवालाद्वारे लाखो रुपये पाकिस्तानात पाठवल्याचे तपासात समोर आले आहे.
कल्पना पाकिस्तानी अबिदच्या संपर्कात
कल्पनाचा मित्र अशरफचा भाऊ यामा अबिदच्या ती थेट संपर्कात होती. दोघांचे फोनवर अनेकवेळा संभाषण झाल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्यावर पाकिस्तानात कारवाई झाल्यानंतर कल्पनाने त्याला मदत केल्याचेही ती सांगत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यांच्यात आर्थिक व्यवहार हवालामार्फत झाले.
बिल्डरने पाठवले कल्पनाला दीड लाख
कल्पनाच्या बँक खात्याची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. तिच्या एकाच बँक खात्यात ३२ लाखांचे व्यवहार झाले. त्यात एका नामांकित बिल्डरने तिला दीड लाख रुपये पाठवल्याचे समोर आले. नेमकी रक्कम कशासाठी दिली हे समजू शकले नाही. मात्र तिच्या अन्य बँक खात्यांची माहिती पोलिस मिळवत असून, त्यात आणखी काही व्यवहार झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही राजकीय व्यक्तींकडे तिने पैशाची मागणी केली होती.
संपर्कातील व्यक्ती रडारवर, सीडीआर तपासणी सुरू
कल्पनाच्या मोबाईलचा संपूर्ण सीडीआर पोलिसांनी काढला असून, त्यात तिच्या वारंवार संपर्कात असलेल्या व्यक्ती आता रडारवर आल्या आहेत. त्या सर्वांची माहिती पोलिस मिळवत आहेत. तिने अनेक कॉल व्हॉट्सॲपद्वारे केल्याने सायबर पोलिसांची मदत घेतली जात आहे. मोबाईलमधील चॅटिंगची तपासणी केली जात आहे.
अशरफने क्रेडिट कार्डने हॉटेलचे बिल भरले
अशरफ कल्पनाला भेटण्यासाठी एप्रिलनंतर अनेकवेळा शहरात आला होता. त्यावेळी हॉटेल ॲम्बेसेडरचे बिल त्याने क्रेडिट कार्डने भरले होते. तसेच तो एमटीडीसीमध्ये वास्तव्यास असायचा, असे तिने कबुली जबाबात म्हटले आहे. मात्र ती फिरवाफिरवी करत असून, अशरफ ती थांबलेल्या हॉटेलातच भेटायला येत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
एमटीडीसीच्या गेस्टहाऊसमध्ये मुक्काम
कल्पनाचा अफगाणी मित्र अशरफ हा एप्रिलनंतर अनेकवेळा शहरात आला होता. तो रेल्वेस्टेशन परिसरातील एमटीडीसीच्या गेस्टहाऊसमध्ये मुक्कामी राहत होता. या काळात कल्पनासोबत त्याची सातत्याने भेट झाली. दरम्यान, ड्रायफ्रूटचा व्यवसाय करणारा अशरफला कल्पनाने काही ऑर्डरही मिळवून दिल्या होत्या.