

छत्रपती संभाजीनगर : वसतिगृहाचा भोजन ठेका अनियमितता, उच्च पदस्थांवरील गंभीर आरोप, महिला कर्मचाऱ्यांना घरकामांसाठी राबवून घेणे आदी कारणांमुळे वादात सापडलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त आणि जिल्हा जातपडताळणी समितीच्या विद्यमान उपायुक्त जयश्री सोनकवडे यांना मंगळवारी (दि.२३) अखेर निलंबित करण्यात आले. या विभागाचे सहसचिव सो.ना. बागल यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
सोनकवडे यांनी मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांचे प्रस्ताव अडवून ठेवले होते. संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहात भोजनासाठी मर्जीतील ठेकेदाराची नियुक्ती करणे, वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्यांना घरातील खासगी कामे करवून घेणे, अधिकारी-कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ प्रलंबित ठेवणे आदी गोष्टींची नोंद निलंबन आदेशात केली आहे.
निलंबन काळात त्यांचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक उपायुक्त कार्यालय राहील. त्यांना याकाळात पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही आणि या काळात त्यांना कोणतीही खासगी नोकरीही करता येणार नाही, असेही या निलंबन आदेशात म्हटले आहे.
निलंबनानंतर थेट मंत्र्यावरच आरोप
निलंबन आदेश प्राप्त होताच सोनकवडे यांनी कार्यालयीन व्हॉट्सॲप ग्रुपवर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह या विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, आयुक्त दीपा मुधोळकर, प्रशांत चव्हाण, हरेश्वर डोंगरे तसेच चौकशी समितीतील सुरेंद्र पवार आमि प्रमोद जाधव, वंदना कोचुरे या सर्वांच्या कामामुळे मला निलंबित करण्यात आल्याचा आरोप केला आहे.