

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात झाडांचे प्रमाण कमी असल्याने मियावाकी पद्धतीने घनदाट वृक्ष लागवडीचे प्रकल्प राबविण्यात येत आहे. तर दुसरीकडे मोठ्याप्रमाणात मोठी व ५० ते शंभर वर्षे जुनी झाडांचे पुनर्रोपण करण्याऐवजी कत्तल केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जालना रोडवर प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी लहानमोठी २५२ झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे.
शहरात हिरवळीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्रदूषणात मोठ्याप्रमाणात वाढ झाली असून त्यासोबतच सिमेंटच्या जंगलामुळे उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाणही वाढले आहे. हा प्रकार कमी करण्यासाठी शहरातील रस्त्यांच्या लगत हरीत पट्टे असणे आवश्यक आहे. तसेच महापालिकेने दुभाजकांमध्ये लहानमोठी झाडे लावून हिरवळीत वाढ करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला आहे. शहरात उद्यानांची संख्यादेखील अतिशय कमी आहे. असे असतानाही शहराच्या विविध भागांत दररोज अथवा महिन्यातून किमान दहा दिवस कुठे ना कुठे विना परवानगी वृक्षतोड सुरू असल्याचे प्रकार दिसतात. या वृक्षतोडीकडे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सतत लक्ष असते.
आतापर्यंत उद्यान विभागप्रमुख विजय पाटील यांनी विना परवानगी वृक्षतोड करणाऱ्यांना दंड आकारणी करून त्याची वसुली केली आहे. दरम्यान, शहरातील शासकीय कार्यालयांकडून विकास कामांसाठी आता वृक्षांच्या कत्तलीचे प्रस्ताव सादर केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच खंडपीठाच्या बाजूला असलेल्या सर्व्हे नंबर ११ मध्ये प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या जागेत हा प्रकल्प होणार आहे. तेथे सध्या लहान मोठी सुमारे २५२ झाडे आहेत. यात प्रामुख्याने सुबाभूळ आणि कडूनिंब यासह शेवगा, पिंपळ, निलगिरीचा समावेश आहे. ही झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यात यावी, यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग जुना मुंबई हायवे असलेला नगरनाका ते दौलताबाद टी पॉईंट रस्ता सहापदरी करणार आहे. या रुंदीकरणाआड सुमारे ५० ते शंबर वर्षे जुनी लहानमोठी तब्बल ७५० झाडे आहेत. ज्यात वड, पिंपळ आणि इतर जातींच्या झाडांचा समावेश असून ते सर्व तोडण्यासाठी अगोदरच एक प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाकडे दाखल झालेला आहे. त्यासोबतच गरवारे स्टेडियममध्ये साऊथ पव्हेलियन उभारण्यासाठी सुमारे ५० ते ६० झाडे तोडण्याचा देखील प्रस्ताव आहे.