

Inspection of works at Shendra MIDC is also poor
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीची बोगस आणि निकृष्ट कामांमुळे अत्यंत दयनीय दुरवस्था झाली आहे. गंभीर बाब म्हणजे, कार्यालयात बसूनच ठेकेदारांच्या कामांची गुणवत्ता तपासणी होते. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन तपासणी न करता अधिकारी कागदो-पत्री ओके रिपोर्ट देऊन मोकळे होतात, असा कारभार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ठेकेदार निर्वावले असून, मनमानी पद्धतीने निकृष्ट कामे केली जात आहे.
येथील शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सध्या काम मिळवायचे... ते निकृष्ट करायचे आणि पितळ उघडे पडलेच तर प्रशासनाच्या आशीर्वादाने पुन्हा थातूर-मातूर पॅचवर्क करून कागदोपत्री ओके रिपोर्ट मिळवून विषय संपवायचा असले प्रकार बिनबोभाट सुरू आहेत. यामुळे फाईव्ह स्टार इंडस्ट्रीची पुरती वाट लागली आहे. एमआयडीसीच्या प्रवेश मार्गासह अनेक रस्त्यांचे निकृष्ट काम झाल्याने ते रस्ते काही महिन्यांतच उखडून अत्यंत दयनीय दुरवस्था झाली आहे.
दर्जाहीन कामांमध्ये येथील रस्त्यांचा अक्षरशः धुरळा झाला आहे. जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्याच्या चाळणीमुळे खडी पसरल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. मात्र या बोगस कामांची एमआयडीसीकडून पाठराखण सुरू असल्याचे दिसत आहे. रस्त्यांच्या निकृष्ट कामे करणाऱ्यांना कागदोपत्री ओके रिपोर्ट देऊन प्रशासन मोकळे झाले आहे. मात्र स्थानिक उद्योजक, कामगार एमआयडीसीतील खडेमय रस्त्यांमुळे त्रस्त झाले आहे. जर या कामांची नियमानुसार गुणवत्ता तपासणी झाली असती तर निकृष्ट कामांचे पितळ नक्कीच उघडे पडले असते, अशी भावना स्थानिक उद्योजकांनी व्यक्त केली. यापुढे एमआयडीसीने ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असेही उद्योजक म्हणाले.
प्रत्यक्ष तपासणी नसल्याने ठेकेदारांची मनमानी
रस्त्यांची कामे सुरू असताना क्षेत्रिय परीक्षण व काम झाल्यावर प्रत्यक्ष साईडवर जाऊन गुणवत्ता तपासणी करणे गरजेचे असते, परंतु काही अधिकारी प्रत्यक्ष स्पॉटवर जात नसल्याने ठेकेदारांची मनमानी वाढली आहे. त्यामुळे एमआयडीसीत निकृष्ट कामांचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे.
काम दर्जेदार, मग नवीन रस्ते उखडले कसे ?
एमआयडीसीत नवीन रस्त्यांनाही जागोजागी खड्डे पडले आहेत. जर जबाबदार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामांची गुणवत्ता तपासणी केली होती आणि कामेही दर्जेदार होती तर मग हे नवीन रस्ते काही महिन्यांतच उखडले कसे ? असा सवाल उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे.
उद्योगांना चांगल्या सुविधा द्याव्यात
उद्योगांना चांगले रस्ते आणि दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, हे एमआयडीसीचे काम आहे. त्यांनी ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. एमआयडीसीत खराब रस्त्यांसह अनेक समस्या आहेत. या अडचणी दूर करून उद्योगांसाठी आवश्यक सोयीसुविधा द्याव्यात. -प्रमोद देवकर,
स्थानिक उद्योजक