

नाचनवेल/हतनूर, पुढारी वृत्तसेवा: कन्नड तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोघे जण पाण्यात वाहून गेले.
तालुक्यातील सारोळा परिसरातील एक व्यक्ती अंजना नदी पात्रात वाहून गेला. साळूबा सांडू गाडेकर (रा.सारोळा) असे नदी पात्रात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा शोध घेण्यात आला. परंतु, त्याचा शोध न लागल्याने छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले आहे. त्यातच जोरदार पाऊस सुरु झाला असल्याने शोधकार्य थांबवुन पुन्हा मंगळवारी सकाळी शोध कार्य सुरू करणार असल्याचे अग्निशमन दल व पोलिस विभागाकडून सांगण्यात आले.
तर दुसऱ्या घटनेत कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारातील गांधारी नदीच्या शिंदे कोल्हापूर बंधाऱ्यात (केटी वेयर) तरुण पाण्यात पाय घसरुन पडला. तो पाण्यात बुडाला ही घटना सोमवारी दुपारी २.३०च्या दरम्यान घडली असून रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम घेतली, पण तो सापडून आला नाही.
सागर संजय गायकवाड (अंदाजे वय २१, रा घुसुर ता कन्नड.) असे या तरुणाचे नाव आहे. घटनेची नोंद कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.