

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation raid
छत्रपती संभाजीनगर: शहरातील रशिदपुरा भागात सुरू असलेल्या एका अवैध गर्भपात केंद्रावर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि सिटी चौक पोलिसांनी संयुक्त धाड टाकून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन महिला आरोपींसह एकूण सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गर्भपाताचे साहित्य आणि औषध जप्त करण्यात आली आहेत.
सिटी चौक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांना रशिदपुरा येथील 'खमर विला' (प्लॉट नं. १६) मध्ये अवैध गर्भपात होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीने ही माहिती महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना दिली.
महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मंगळवारी (दि. २८) पहाटे २ वाजता छापा टाकला. या कारवाईदरम्यान पथकाला गर्भपातासाठी लागणारे वैद्यकीय साहित्य, औषधे आणि सोनोग्राफीसाठी वापरला जाणारा एक 'प्रोब' मिळून आला. एका महिलेला गर्भपातासाठी २७ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता या ठिकाणी आणले होते. तिला गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या, मात्र तिची प्रकृती खालावल्याने तिला पहाटे ३.३० वाजता उपचारासाठी घाटी रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी खालील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
१. श्रीमती शाहिदा परवीन सय्यद इशाद अहमद (वय ५१) - आरोपी
२. श्रीमती नसरीन वजीर शेख (वय ४७) - आरोपी
३. सय्यद इर्शाद अहमद (वय ६१) - आरोपी
४. मंगेश सुखदेव थोरात (लॅब चालक, पळशी केंद्र)
५. मीनाक्षी मंगेश थोरात (लॅब चालक)
६. गर्भवती महिलेची आई
तपासात असे समोर आले आहे की, संबंधित महिलेची तपासणी सिडको एन-६ येथील 'बिटेल डायग्नोस्टिक पॅथलॅब' मध्ये करण्यात येत होती, ज्याचे मुख्य केंद्र पळशी येथे आहे.
या यशस्वी कारवाईत मनपाचे डॉ. अमरज्योती शिंदे, डॉ. राठोडकर, डॉ. सुनील पाटील, गयासउद्दीन, संजय शिरोडकर, प्रवीण रांजणगावकर तसेच पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अर्जुन कदम, कांचन मिरधे आणि दामिनी पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये 'अवैध गर्भपात' आणि 'गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्या' (PCPNDT Act) नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.