

If you behave obscenely in the area of Buddhist Caves, Hanuman Hill, a case will be registered directly
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील ऐतिहासिक हनुमान टेकडी, बौद्ध लेणी आणि निपटनिरंजन महाराज परिसरात फिरण्याच्या बहाण्याने मद्यपान करणे, नशा करणे आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी टोळक्याने विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. तर टवाळखोरांनी दोन तरुणींची छेड काढल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यानंतर आता बेगमपुरा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी या परिसरात गस्त वाढवण्यात आली असून, सायंकाळी सहा वाजेनंतर टेकडीवर थांबणाऱ्यांना बाहेर काढले जात आहे.
निसर्गरम्य वातावरणामुळे या भागात दररोज नागरिक आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र काही तरुणांकडून अनुचित प्रकार आणि - किरकोळ भांडणांच्या घटना घडत असल्याचे बेगमपुरा ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव - यांच्या निदर्शनास आले.
या प्रकारांची गंभीर दखल घेत परिसरात डायल ११२, मार्शल आणि महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाची विशेष गस्त सुरू करण्यात आली आहे. निरीक्षक प्रवीणा यादव यांनी स्वतः हनुमान टेकडी परिसराची पाहणी करून आढावा घेतला. सायंकाळी सहाला लेणी बंद होत असल्याने, त्यानंतर नागरिकांना डोंगर परिसरातून बाहेर जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करत रात्रीच्या वेळी टेकडीवर न थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ट्रिपल सीट दुचाकी, संशयास्पद कार आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली.