

ICAI Final Exam Results Declared : Over 45 students from Sambhajinagar have become Chartered Accountants (CAs)
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे मे २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'सीए' अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.१८) जाहीर झाला. या परीक्षेत छत्रपती संभाजीनगरमधील ४५ हून अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत 'चार्टर्ड अकाउंटंट' म्हणून पात्रता प्राप्त केली आहे.
यंदाच्या निकालात शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत प्रणव लड्डा याने अखिल भारतीय स्तरावर १७ वा क्रमांक मिळवून शहरातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. तसेच यशराज घाडगे याने देशपातळीवर ४७ वा क्रमांक मिळवून शहरात द्वितीय स्थान पटकावले. याशिवाय उदय कोठारी याने तृतीय, साक्षी बाहेती हिने चतुर्थ, तर देविका चुट्टर हिने शहरातून पाचवा क्रमांक मिळवला.
छत्रपती संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष सीए अमोल गोधा यांनी या यशस्वी गुणवंतांची माहिती दिली. यावेळी शाखेचे उपाध्यक्ष केदार पांडे, रफिक पठाण, ऐश्वर्या ब्रम्हेचा, आनंद तोतला, समीर शिंदे तसेच माजी अध्यक्ष व शाखा समिती सदस्य महेश इंदानी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
असा लागला शहराचा निकाल
सीए अंतिम परीक्षेसाठी शहरातून एकूण ५२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८५ विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये यश मिळवले. याचा तपशील पुढीलप्रमाणे :
गट-१: १९३ पैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण.
गट-२ : १५३ पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण.
दोन्ही गट : बसलेल्या १७९ पैकी २२ विद्यार्थ्यांनी दोन्ही गट एकाच वेळी उत्तीर्ण केले.
याशिवाय काही विद्यार्थ्यांनी स्वतंत्र गटांमध्येही यश संपादन केले.