

हिंगोली : हिंगोली नगर परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. मतदान केंद्रावर एका महिला मतदाराला कोणत्या उमेदवाराला मतदान करावे हे त्यांनी थेट सांगितल्याचा व्हिडिओ समोर आल्याने तसेच मतदान केंद्राच्या परिसरात घोषणाबाजी केल्याप्रकरणी आमदार बांगर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतदान केंद्रावर आमदार बांगर यांनी एका महिला मतदाराला मतदान चिन्ह सांगून मतदानाच्या गोपनियतेचा भंग केला. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. या घटनेसोबतच आणखी एका व्हिडिओमध्ये आमदार बांगर मतदान केंद्राच्या आसपास कार्यकर्त्यांसह जोरदार घोषणाबाजी करताना दिसले. निवडणूक आयोगाच्या आचार संहितेनुसार मतदान केंद्राच्या परिसरात प्रचार, घोषणाबाजी किंवा मतदारांना प्रभावित करणारी कोणतीही कृती करण्यास पूर्णपणे मनाई आहे.
मतदान कक्षात जाऊन सांगितले मतदान चिन्ह
उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित केंद्राध्यक्षांकडून अहवाल मागविला. अहवालात आमदार बांगर यांनी गोपनियतेचा भंग केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर केंद्राध्यक्ष दिलीप रामेश्वर चव्हाण यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार बांगर यांनी मतदान कक्षात जाऊन महिलेला मतदान चिन्ह सांगून गोपनियतेचा भंग केला तसेच घोषणा दिल्या, अशी तक्रार दाखल झाली आहे. दरम्यान, भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.