

छत्रपती संभाजीगनर ( गंगापूर ) : जळगावहून खासगी आराम बसने पुण्याला जाणाऱ्या व्यक्तीचा रविवारी (दि.3) रोजी मध्यरात्री कायगावनजीक हृदयविकाराने मृत्यू झाला. राजेशकुमार केशवदास आहुजा (वय ५४, रा. हतनूर, जि. जळगाव) असे मयताचे नाव आहे.
राजेशकुमार केशवदास आहुजा हे मुलगा रोहनसोबत रविवारी (दि.3) जळगावहून खासगी बसने पुण्याला जात होते. मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर कायगावजवळ ट्रॅव्हल्समध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. याची माहिती त्यांनी बसचालकाला दिली. जवळपास कोठेही रुग्णालय नसल्याने कायगाव येथेच बस थांबवून रोहन याने एका खासगी रुग्णवाहिकेला बोलावले. रुग्णवाहिका आल्यानंतर आहुजा यांना त्यात बसवले. तोपर्यंत ट्रॅव्हल्सही थांबून होती, असे रुग्णवाहिका चालकाने सांगितले. रुग्णवाहिकेने तत्काळ आहुजा यांना गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी आहुजा यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विजय पाखरे करत आहेत.