Harsul Lake : पाणी उपशातून हर्सूल तलावाला मिळणार विश्रांती

नव्या जलवाहिनीतून जुन्या शहराचा पाणीपुरवठा : १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी अंतिम टप्प्यात
Harsul Lake : पाणी उपशातून हर्सूल तलावाला मिळणार विश्रांती
Published on
Updated on

Harsul Lake to get respite from water extraction

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दशकांपासून जुन्या शहराची तहान भागविणाऱ्या हर्सल तलावावरील नियमित भार आता कमी होणार आहे. नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत हर्सूलपर्यंत टाकण्यात आलेल्या १५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, ती कार्यान्वित झाल्यानंतर तलावातून दररोज केला जाणारा पाणीपुरवठा थांबविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. सध्या तलावात १९ फूट पाणीसाठा उपलब्ध असून, गरज भासल्यास भविष्यात हा जलस्रोत राखीव पर्याय म्हणून वापरला जाणार आहे.

शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत हर्सूल तलावाचे ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे. निजामकालीन प्रशासनाने १९५४ मध्ये हा तलाव उभारला. त्यावेळी शहरासाठी स्वतंत्र मोठी योजना नसल्याने हर्सूल तलाव आणि ५२ नहरींच्या माध्यमातून सुमारे ११.५ एमएलडी पाणीपुरवठा होत होता. १९७५ मध्ये जायकवाडी आधारित योजना सुरू झाल्यानंतर तलावावरील अवलंबित्व कमी झाले.

तरीही पाणीटंचाई अथवा प्रमुख योजनांमध्ये अडथळे निर्माण झालेल्या काळात हर्सूल तलावाने शहराला मोठा आधार दिला आहे. नव्या योजनेतून हर्सलपर्यंत मोठ्या क्षमतेची जलवाहिनी पोहोचविण्यात आली असून, तिची हायड्रॉलिक चाचणी सुरू आहे. ही चाचणी पूर्ण होताच तलावातील पाण्याचा दैनंदिन वापर बंद केला जाणार आहे.

दरम्यान, हर्सूल तलावाची एकूण साठवण क्षमता २८ फूट आहे. गतवर्षीच्या चांगल्या पावसामुळे तलाव ओसंडून वाहिला होता. सध्या उपलब्ध १९ फूट पाणीसाठा नियमित वापर सुरू राहिला तरी दिवाळीपर्यंत पुरेसा ठरेल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. तसेच तलावातून शहरासाठी दररोज सुमारे साडेसात एमएलडी पाणी उपलब्ध करून दिले जाते. मात्र नव्या जलवाहिनीतून पुरवठा सुरू झाल्यानंतर तलावावरील हा ताण कमी होईल. तर मुख्य योजनेत बिघाड अथवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास हर्मूल तलावाचा पर्याय कायम खुला ठेवण्यात येणार आहे.

या भागांना मिळत होते हर्सूलचे पाणी भगतसिंगनगर, एकतानगर, चेतनानगर, राजनगर, वानखेडेनगर, मयूर पार्क, सुरेवाडी, मेहमुदपुरा, मुजफ्फरनगर, रोजेबाग, किलेअर्क, जहांगीर कॉलनी, हर्सल आणि सादात कॉलनी या भागांना तलावातून दररोज सुमारे पाच एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता.

राखीव जलस्रोत म्हणून महत्त्व कायमनव्या योजनेमुळे हर्सूल तलावाचा नियमित वापर थांबणार असला तरी त्याचे महत्त्व कायम राहणार आहे. पाणीपुरवठा यंत्रणेत अडथळे, दुरुस्तीची कामे किंवा टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास शहरासाठी हा तलाव पुन्हा एकदा आधारस्तंभ ठरणार आहे. त्यामुळे हर्सूल तलाव शहराच्या जलसुरक्षेतील महत्त्वाचा राखीव स्रोत म्हणून कायम राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news