

Gutkha worth 52 lakhs seized at Anvi Fata
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : खान्देशातून गुटखा घेऊन येणारे वाहन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून पकडले. चालकाला ताब्यात घेत ५२ लाखांचा गुटखा, २० लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
ही जम्बो कारवाई तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील अन्वी फाट्यावर मंगळवारी (दि. १७) सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास करण्यात आली. चालक विकास सुभाष पाटील (३४, रा. नंदाळे, जि. धुळे), एकनाथ पाटील (रा. देवपूर, जि. धुळे), अख्तर बेग हाजी अय्युब बेग (रा. भोकरदन जि. जालना), आयशर मालक गणेश पंडित महाले (रा. फागणे, जि. धुळे) असे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आर-ोपींची नावे आहेत. खान्देशातून आयशरमधून (एमएच १८, बीजी- ८०४६) भोकरदनकडे मोठ्या प्रमाणात गुटखा जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळाली होती.
मिळालेल्या माहितीवरून पोलिस मंगळवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील अन्वी फाट्यावर सापळा लावून उभे होते. या दरम्यान वरील क्रमांकाचे वाहन आले. पोलिसांनी हात देऊन थांबवत पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चालकालासह वाहन सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले. वाहनातील पोत्यांची पाहणी केली असता तब्बल ५२ लाख रुपये किमतीचा गुटखा सापडला.
पोलिसांनी चालकाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता एकनाथ पाटील याच्याकडून अख्तर बेग हाजी अय्युब बेग याच्याकडे गुटखा घेऊन जात असल्याची माहिती दिली. या प्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक, मालक यांच्यासह गुटखा खरेदी विक्री करणाऱ्या अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लहू घोडे करीत आहेत.
ही दमदार कारवाई पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णासिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे, पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल डोके, वाल्मिक निकम, संतोष पाटील,गोपाल पाटील, दीपक सुरवसे यांनी केली.
खान्देशातून मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात गुटखा आयात केला जातो. यापूर्वी अजिंठा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छोट्या-मोठ्या कारवाया केलेल्या आहेत. तरी देखील गुटख्याची आयात व वाहतूक मात्र थांबलेली नाही. अवैध गुटखा विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होते, हे या कारवाईतून समोर आले आहे. या गोरख धंद्यातून गुटखा विक्री करणारे चांगलेच गब्बर झाले असून गुटखा विक्रीचे मोठे रॅकेट असल्याचे बोलले जाते.