

वैजापूर ( छत्रपती संभाजीनगर) , नितीन थोरात
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या तब्बल ३४ लाख १९ हजार ९१५ रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी मंगळवारी (दि. २३) माहिती देताना सांगितले की, या प्रकरणात आठ ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे.
परिचालकांना देण्यात येणाऱ्या चौकशीअंती १३ सरपंचांवरही कारवाईही केली जाणार आहे. १७ जुलै रोजी वैजापूर पंचायत समितीच्या बैठकीदरम्यान हा मोठा घोटाळा उघडकीस आला होता. ग्रामपंचायतींकडून संगणक मानधनात लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी प्रशासनाने केवळ एका ऑपरेटरवर कारवाई केली होती; मात्र जेवढा ऑपरेटर दोषी, तेवढेच सरपंच व ग्रामसेवकही दोषी असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढारी ला ठामपणे सांगितले होते. दरम्यान, पुढारीने सातत्याने या घोटाळ्याचा पाठपुरावा केल्यानंतरच या कारवाईचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. नागरिकांचा दबाव आणि सातत्याने होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला कारवाई करावी लागली आहे, हे एका माध्यमाचे यश नसून सर्वसामान्य नागरिकांचे यश असल्याचे भावना जिल्हाभरात निर्माण झाली आहे.
आठ ग्रामसेवकांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच सरपंचाची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. या सोबत दप्तर तपासणी करून विभागीय चौकशीमध्ये आलेल्या आरोपानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
अंकित (सीओ जि. प.छत्रपती संभाजीनगर)
इतर तालुक्यांमध्ये घोटाळा उघड होण्याची शक्यता...
तालुक्यात राहून इतर ग्रामसेवकांना मार्गदर्शन करणाऱ्या एका ग्रामसेवकाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून, त्याचा एक साथीदार वैजापूरमध्ये आजही कार्यरत आहे. घोटाळ्याचा मास्टरमाईंड तोच असल्याने जिल्ह्यात या घोटाळ्याचे लोण पसरल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे जसा वैजापूरात आठ ग्रामसेवक निलंबित झाले, तसेच जिल्हाभर हा घोटाळा उघडकीस येऊन अनेक ग्रामसेवक निलंबित होण्याची शक्यता आहे.
गुन्हा दाखल कधी होणार..?
घोटाळा उघडकीस येताच ऑपरेटरवर तात्काळ वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पण ग्रामसेवकांवर मात्र तब्बल दोन महिने थांबल्यानंतर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला आहे. प्रश्न असा की जेव्हा दोष स्पष्ट आहेत, तेव्हा गुन्हा दाखल करण्यास विलंब का? गावखेड्यांतून एकच आवाज उठतोय? दोशी आहेत तर थेट गुन्हा दाखल करा, नाहीतर प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरतेय. नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून जिल्हाभरातून प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार होत आहे. अखेर सरपंचड्ड ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल होणार कधी, याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत.