Sambhajinagar Garbage Collection : आता जीपीएस नियंत्रण कक्षातून शहरातील घंटागाड्यांवर नजर

मनपा आयुक्तांचे आदेश; सफारी पार्कच्या झाडांसाठी एसटीपीचे पाणी
Sambhajinagar Garbage Collection
Sambhajinagar Garbage Collectionpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कचरा संकलन आणि वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान व प्रभावी करण्यासाठी घंटागाड्यांवर आता जीपीएसद्वारे नजर ठेवली जाणार आहे. यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश बुधवारी (दि.१०) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिले. या प्रणालीमुळे प्रत्येक भागात घंटागाडी कोणत्या वेळेला पोहोचणार, याचे अचूक नियोजन नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

महापालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या या बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागांमध्ये किंवा भिंतींच्या आडोशाला वारंवार कचरा टाकला जाणाऱ्या ब्लॅक स्पॉटची तातडीने स्वच्छता करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. एकदा स्वच्छता केलेल्या जागेवर पुन्हा कचरा साचणार नाही यासाठी तेथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सफारी पार्कसाठी एसटीपीच्या पाण्याचा पर्याय; विहीर खोदणार

बैठकीत मिटमिटा येथील प्रस्तावित सफारी पार्क आणि प्राणिसंग्रहालय परिसरातील वृक्षसंवर्धनाचा विषयही चर्चिला गेला. येथील झाडांच्या संगोपनासाठी सफारी पार्क परिसरात एक नवीन विहीर खोदली जाणार आहे. तसेच पडेगाव येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील शुद्ध केलेले पाणी पाईपलाईनद्वारे या विहिरीपर्यंत पोहोचविण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

या कामासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. याशिवाय नियोजित सफारी पार्कच्या जागेभोवती संरक्षण भिंत उभारण्यासाठी आवश्यक अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news