

पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील नाथसागर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या दगडी पुलावर कार पाठीमागे घेण्याच्या कारणावरून मारहाण करून १ लाख ८२ हजार किंमतीची सोन्याची अंगठी व गळ्यातील लॉकेट लुटून नेले. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात २ अनोळखीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sambhajinagar Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, हनुमान जयंतीनिमित्त खुलताबाद येथे मित्रासोबत मारुतीचे दर्शन घेण्यासाठी बाप्पासाहेब बबन मडके (रा.सोनेसांगवी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) हे कारमधून आले होते. यावेळी दगडी पुलावर कार मागे घेण्याच्या कारणावरून दीपक भोईटे, आकाश उबाळे, बबलू भोसले, टिंकू वाळके, प्रशांत कुटे (सर्व रा. माळी बाभुळगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर), सागर निकम (रा. मढी, ता. पाथर्डी) यांनी कार पाठीमागे घेत नाही म्हणून बाप्पासाहेब मडके यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला व नाकाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर बाप्पासाहेब याच्या हातातील चार सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील लॉकेट असे एकूण १ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल लुटून नेला.
या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे करीत आहेत.