

गंगापूर : गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील मका उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी मका खरेदी केंद्रांना तातडीने मुदतवाढ व उद्दिष्ट वाढवून देण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खरीप पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत गंगापूर, लासुर स्टेशन, खुलताबाद व बाजारसावंगी येथे मका खरेदी केंद्रांना उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर ही केंद्रे बंद करण्यात आल्याने अनेक नोंदणीकृत शेतकऱ्यांचा मका खरेदीविना शिल्लक राहिला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, गंगापूर केंद्रावर ११०० शेतकऱ्यांचा सुमारे ३४,१७२ क्विंटल मका, लासुर स्टेशन केंद्रावर ५४० शेतकऱ्यांचा १५,४७१.४३ क्विंटल मका, खुलताबाद केंद्रावर ३३४ शेतकऱ्यांचा सुमारे ६,००० क्विंटल मका, तर बाजारसावंगी केंद्रावर ५७० शेतकऱ्यांचा ९,७९२ क्विंटल मका खरेदी बाकी आहे. चारही केंद्रांवर मिळून एकूण ६५,४३५.४३ क्विंटल मका खरेदी प्रलंबित आहे.
यासंदर्भात मंत्री महोदयांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात तातडीने मुदतवाढ देणे, नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या मक्याच्या खरेदीसाठी उद्दिष्ट वाढविणे आणि २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा मका खरेदी कालावधी वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर मंत्री महोदयांनी ‘अ’ प्रमाणे सत्वर कार्यवाहीचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.
“शेतकऱ्यांचा मका योग्य दराने खरेदी होणे अत्यंत आवश्यक आहे. खरेदीअभावी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने तातडीने पावले उचलावीत,” असे निर्देश मंत्री महोदयांनी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे मतदारसंघातील मका उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टळण्यास मदत होणार असून, खरेदी प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.