

Gang violence on Jatwara Road, three stabbed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : थर्टी फर्स्टच्या रात्री जटवाडा रोडवर टोळक्याने धुमाकूळ घालून रस्त्याने जाणाऱ्या दोन दुचाकीवरील तिघांवर चाकूहल्ला करून जखमी केले. या दोन्ही घटना गुरुवारी (दि.१) मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास एकतानगर, जटवाडा रोडवर घडल्या. दरम्यान, चाकूहल्ला करणाऱ्या चारही आरोपींना हसूल पोलिसांनी २४ तासांत बेड्या ठोकल्या.
उस्मान खान शाबू खान हमीद खान (२१), नीलेश मनोहर घोरपडे (२३), घनश्याम बंडू खरात (२०) आणि आयुष विलास सोनवणे (२०, चौघेही रा. एकतानगर) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती माहिती हर्सल ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी शुक्रवारी (दि.२) दिली.
पहिल्या घटनेचे फिर्यादी शेख नवीद शेख सलीम (४०, रा. अंबरहील) यांच्या तक्रारीनुसार, ते हॉटेलमध्ये काम करून उदर्निवाह करतात. रात्री कामावरून घराकडे दुचाकीने निघाले होते. रस्त्यात तिघांनी त्यांना आवाज देऊन थांबविले. दुचाकीचा वेग कमी करून काय झाले अशी विचारणा करताच त्यांना शिवीगाळ करून मारहाण सुरु केली.
एकाने चाकूने मांडीवर दोन वार करून जखमी केले. आरडाओरड करताच आरोपी पसार झाले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेनंतर काही वेळातच दुसरी घटना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने मटण मार्केट समोर रोडवर घडली. फिर्यादी सोहेल बुढान शेख (१९, रा. देवळाई) हे त्याचा मामेभाऊ आरेफ खान दोघे दुचाकीने जात असताना रस्त्यात चौघांनी अडविले.
मारहाण करून चाकूने मांडीवर वार करून जखमी केले. याप्रकरणी हसूल पोलिस ठाण्यात अनोळखी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून हसूल ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार यांनी तात्कळ तपासाची चक्रे फिरवली. पीएसआय गणेश केदार, हवालदार पालवे, आकाश जायभाये, मोहन सिंगल, तडवी यांच्या पथकाने चारही आर- ोपींना बेड्या ठोकल्या. दोन्ही चाकूहल्ले याच टोळक्याने केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भररस्त्यात धिंगाणा घालून हल्ले
या टोळक्याने थर्टी फर्स्टच्या रात्री जटवाडा रोडवर चांगलाच धिंगाणा घातला. रस्त्याने येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनचालकांना दमदाटी केली. चौघेही नशेत धुंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन दुचाकी अडवून चौघांनी तिघांवर चाकूहल्ले करत दहशत माजवली.