

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन स्थळांची स्वच्छता व दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली असून, शहरातील प्रमुख विसर्जन केंद्रांपैकी टीव्हीसेंटर परिसरातील विहिरींच्या स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली असून, येत्या तीन दिवसांत औरंगपुरा येथील विहिरीच्या सफाईला सुरुवात होणार आहे. लवकरच ही कामे पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
दरवर्षी गणेश विसर्जनासाठी हजारो गणेशमूर्ती शहरातील विहिरी, तलाव व इतर विसर्जन स्थळांवर नेल्या जातात. त्यामुळे आधीपासूनच या ठिकाणांची स्वच्छता व दुरुस्ती करणे अत्यावश्यक असते. याच अनुषंगाने महापालिकेकडून सफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात विहिरींमधील गाळ काढणे, पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवणे, तसेच नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक सोयी-सुविधांची उभारणी करण्याचे कामही सुरू आहे. दरम्यान औरंगपुरा भागातील विसर्जन विहिरींच्या तळाशी वर्षभर साचलेला गाळ व कचरा काढण्याचे काम २८ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे ८ लाखांचा खर्च येणार आहे. मात्र टिव्ही सेंटर भागातील विहिरींच्या सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. साफसफाईसोबतच पाणी साठा तपासणी, दुरुस्ती व परिसरातील कचरा उचलणे सुरू आहे. मनपाला या कामांसाठी ७ लाखांचा खर्च येणार आहे.
येत्या काही दिवसांत शहरातील सर्व प्रमुख विसर्जन स्थळांची सफाई व दुरुस्ती पूर्ण केली जाणार आहे. नागरिकांना गणेशोत्सव काळात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध असून पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी यंदाही विशेष उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या या कामांसाठी ७ लाखांचा खर्च येणार अधिकाऱ्यांनी सांगितले.