

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या सुरक्षेसाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने तब्बल ७०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परंतु यातील ३६ सीसीटीव्ही कॅमेरे मागील ६ महिन्यांपासून इंटरनेटच्या सुविधेअभावी बंद आहेत.
कुठे केबल नादुरुस्त तर कुठे नेटवर्कची समस्या असून, वारंवार सूचना करूनही बीएसएनएल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात या बंद कॅमेऱ्यांमुळे पोलिस यंत्रणेवर सुर-क्षेच्या दृष्टीने अधिक ताण येणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातून संपूर्ण शहराला सीसीटीव्हीचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २०० कोटींचा खर्च झाला आहे. परंतु, या प्रकल्पामुळे संपूर्ण शहराच्या सुरक्षतेमध्ये वाढ झाली आहे. मास्टर सिस्टीम इंटिग्रेडर (एमएसआय) या प्रकल्पातून सुमारे २०० कोटी रुपये खर्चुन शहरात केईसी इंटरनॅशनल या कंत्राटदार एजन्सीने ७०० सीसीटीव्ही बसविले आहेत. या सीसीटीव्हीचे दोन कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले आहेत. यातील एक पोलिस आयुक्तालयात आहे. तर दुसरे स्मार्ट सिटी कार्यालयात कंट्रोल रूम उभारले आहे. या कंत्राटदार एजन्सीकडे २०२६ पर्यंत मेंटेनंसचे काम आहे.
यासोबतच शहरात आणखी २६ कोटी रुपये खर्चुन सेक्युटेक ऑटोमेशन या कंत्राटदार एजन्सीद्वारे हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे नंबर प्लेट रिकोनायझेशन, फेस रिडींग, रेड लाईट व्हायलंस यासाठी बसवले आहेत. या कंपनीकडे २०२७पर्यंत मेंटेनंसचे काम आहे. दरम्यान, शहराच्या विविध भागांत बसविण्यात आलेले सुमारे ३६ कॅमेरे सध्या इंटरनेट सेवेमुळे बंद आहेत. काही ठिकाणी कॅमेऱ्यांचे केबल तुटले आहेत, तर काही ठिकाणी इतर अडचणी आहेत. कंत्राटदार आणि स्मार्टसिटीकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही बीएसए -नएलने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सहा महिन्यांपासून कॅमेरे बंदची समस्या कायम आहे.
शहरात स्मार्ट सिटीने २०० कोटी रुपये खर्चुन ७०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. जवळपासून सर्वच रस्त्यांवर हे कॅमेरे आहेत. त्यासोबतच नंबरप्लेट तपासण्यासाठी सव्वाशे अत्याधुनिक बनावटीचे कॅमेरेही बसविले आहेत. मात्र यातील बहुतांश कॅमेरे बंद राहत असल्याच्या तक्रारी वारंवार पोलिसांकडून स्मार्ट सिटीकडे येत आहेत.
चौकामध्ये लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यावर धूळ बसली असून, ती स्वच्छ करण्याची तसदीही प्रशासनाकडून घेण्यात येत नाही. त्यामुळे अनेक कॅमेऱ्यांतून काहीच दिसत नसल्याचे प्रकारही समोर आले आहेत.