Chhatrapati Sambhajinagar | गेल इंडियाचीही संभाजीनगरला पसंती

१०० मेगावॉटचा सौर प्रकल्प, ऑरिक की बिडकीन? जागेविषयी साशंकता
Solar Highmast
Solar HighmastPudhari
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरची ईव्ही वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमुळे ईव्ही हब होण्याकडे यशस्वी वाटचाल सुरू असतानाच आता ग्रीन एनर्जी (सोलर) प्रकल्पही या शहरात येत आहेत. तीन महिन्यांपूर्वी एलएनके एनजीने येथे प्रकल्प सुरू करण्यासाठी शासनासोबत एमओयू केला असताना आता देशातील आघाडीच्या गेल इंडिया लिमिटेड कंपनीनेही १०० मेगावॅटच्या सौर प्रकल्पात गुंतवणुकीसाठी संभाजीनगरला पसंती दिली आहे. दरम्यान, हा प्रकल्प ऑरिक की बिडकीन औद्योगिक क्षेत्रात होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टोयोटा- किर्लोस्कर कंपनीच्या आगमनापासून शहराचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. संभाजीनगरमधील रस्ते, विमान आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी, वीज आणि पाण्याच्या मुबलकतेमुळे अनेक उद्योग येथील औद्योगिक क्षेत्रात प्रकल्प सुरू करण्यास पसंती देत आहेत. अनेकांचे शासनासोबत एमओयू होऊन जमीन वाटप आणि आवश्यक परवानग्याही प्रदान झाल्या आहेत. एथर, जेएसडब्ल्यू, टोयोटा किर्लोस्करसारख्या मोठ्या प्रकल्पांनी आपले बांधकामही सुरू केले आहे.

अशातच जानेवारी महिन्यात दावोसमध्ये झालेल्या गुंतवणूक परिषदेत एलएनके एनजीने राज्यात १० हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली. यात प्रथम संभाजीनगरात ऑरिक सिटीमध्ये ६० एकर विस्तीर्ण जागेवर हा प्रकल्प उभा राहणार असून, ही कंपनी सोलर पॅनलची निर्मिती करणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. यासह आता देशातील प्रतिष्ठित कंपनी असलेल्या गेल इंडिया लिमिटेडकडूनही संभाजीनगरमध्ये १०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मिळून ३ हजार ८०० कोटी रुपयांची ही गुंतवणूक असणार आहे. गेलच्या अक्षय ऊर्जा पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी या प्रकल्पाचा वापर होणार असून, यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.

अत्याधुनिक स्टोरेज सिस्टीम

या १०० मेगावॅटच्या सौर प्रकल्पात प्रति तास २२ मेगावॅट क्षमतेची बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम बसवली जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील उसर येथील पीडीएच-पीपी प्लँटची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग केला जाणार आहे. या अत्याधुनिक स्टोरेज सिस्टीममुळे सौर ऊर्जेतील खंडिततेच्या समस्या दूर होऊन, चोवीस तास विश्वासार्ह वीज उपलब्ध होणार असल्याच्या चर्चेने उद्योगजगतात आनंद निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news