Maratha reservation : मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई ते आमरण उपोषण

चार दशकांचा संघर्ष... आता जीवाची बाजी; राजेंद्र दाते पाटलांचा ध्येयवेडा प्रवास
Maratha reservation
Maratha reservation : मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई ते आमरण उपोषणfile photo
Published on
Updated on

From the legal battle for Maratha reservation to the fast unto death Rajendra Date Patil

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वयाची तमा नाही, प्रकृतीची चिंता नाही, कुटुंबीयांची काळजी नाही अन् स्वतःच्या जीवाचीही पर्वा नाही...

डोळ्यांसमोर एकच ध्येय, मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळालेच पाहिजे! या ध्येयाने गेली साडेतीन ते पावणेचार दशके झपाटलेल्या ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी आता मराठा आरक्षणाच्या लढ्यात आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. गेल्या अकरा दिवसांपासून त्यांचा उपोषणाचा लढा सुरू असून, मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी त्यांनी केलेल्या प्रदीर्घ संघर्षाचा हा प्रवास त्यांच्या जिद्दीची आणि सामाजिक बांधिलकीची साक्ष देणारा ठरतो. 'आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही' या निर्धाराने सुरू असलेल्या त्यांच्या लढ्याचा दैनिक 'पुढारी'ने घेतलेला हा विशेष आढावा...

Maratha reservation
Sillod News : भरधाव कारची ट्रकला धडक, एक ठार, महिला जखमी

दाते पाटलांचा हा केवळ अकरा दिवसांचा उपवास नाही; त्यामागे तब्बल चार दशकांचा संघर्ष आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न रस्त्यावर आला, तेव्हा आंदोलने झाली; पण दाते पाटील यांनी या प्रश्नाला न्यायालयीन आणि घटनात्मक मार्गानेही भिडविले. विविध आयोगांच्या दारात जाऊन त्यांनी समाजाची बाजू मांडली. न्यायमूर्ती खत्री, बापट, सराफ, भाटिया, म्हसे, गायकवाड, निरगुडे, शुक्रे आदी आयोगांसमोर प्रत्यक्ष सुनावणीत सहभागी होत त्यांनी मराठा आरक्षणासाठी आपली भूमिका मांडली.

सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या विरोधात दाखल झालेल्या दहापेक्षा अधिक याचिकांमध्ये मराठा समाजाच्या वतीने मुख्य हस्तक्षेप याचिकाकर्ता म्हणून ते सहभागी झाले. अनेक याचिकांमध्ये समाजाच्या वतीने एकमेव मुख्य हस्तक्षेप याचिकाकर्ता म्हणून त्यांनी लढा दिला. कागदपत्रे, कायदे, घटनात्मक तरतुदी आणि न्यायालयीन युक्तिवाद यांचा अभ्यास करत त्यांनी या लढ्याला वेगळी दिशा दिली.

Maratha reservation
Water supplied : नवीन योजनेतून चार जलकुंभांत पाणी

आजघडीला चार दशकांपूर्वी सुरू झालेला दाते पाटील यांचा हा प्रवास आज उपोषणाच्या निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. एका बाजूला समाजासाठी न्याय मिळवून देण्याची तळमळ आणि दुसऱ्या बाजूला त्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावण्याची तयारी. या कारणाने दाते पाटलांचा हा लढा केवळ आरक्षणासाठीचा संघर्ष राहिलेला नाही; तो ध्येय, त्याग आणि समाजासाठीच्या निःस्वार्थ बांधिलकीची कहाणी बनला आहे.

आरक्षणासाठी १० वर्षापासून अनवाणी

पायांचा प्रवास २०१६ पासून त्यांनी आणखी एक कठोर निर्धार केला मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पायात वाहन घालणार नाही. तेव्हापासून अनवाणी पायाने फिरत त्यांनी आपला संकल्प जपला. समाजाच्या गळचेपीच्या निषेधार्थ अनेक वर्षे मास्क बांधून आगळे आंदोलन केले. या सगळ्यामागे प्रसिद्धी नव्हती, तर समाजाच्या प्रश्नासाठी काहीतरी करण्याची तळमळ होती.

आरक्षणापलीकडेही समाजासाठी धडपड

दाते पाटलांचा संघर्ष केवळ मराठा आरक्षणापुरता नाही. शहराला सुरळीत पाणीपुरवठा मिळावा म्हणून त्यांनी अनेक जनहित याचिका दाखल केल्या. अन्यायाच्या प्रश्नांसाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. सिमेंट रस्ते, भूमिगत गटार योजना, गुंठेवारी मुदतवाढ, काळा चबुतरा बचाव संघर्ष, डी.पी. प्लॅनमधील सुधारणा अशा अनेक प्रश्नांमध्ये त्यांनी आवाज उठविला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

दाते पाटील, उपोषण मागे घ्या, आवाहन !

आज उपोषणस्थळी येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्यांच्याबद्दलची काळजी दिसते. विविध पक्षांतील नेते, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिक, तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण भेट देत आहेत. प्रकृतीची विचारपूस करत आहेत. तुम्ही आमच्यासाठी आदरणीय आहात... तुमची अँजिओप्लास्टी झालेली आहे... उपोषण मागे घ्या, अशी कळकळीची विनंती करताना अनेकांचे डोळे पाणावतात. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाहीही दिली जाते. पण दाते पाटील मात्र आपल्या निर्णयावर अढळ आहेत.

दाते पाटलांच्या प्रमुख मागण्या !

मराठा समाजाला राजकीय आरक्षण वगळता ओबीसी वर्गाला मिळणाऱ्या सर्व सवलती देण्यात याव्यात. याशिवाय हैद्राबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्राबाबत भूमिका स्पष्ट करावी, एसईबीसीला ओबीसीप्रमाणे सुविधा द्याव्यात, मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, सारथी संस्थेला पाच हजार कोटींचा निधी द्यावा, स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला दहा हजार कोटी द्यावेत, प्रलंबित उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात आणि कायगाव येथे मराठा हुतात्मा स्मारक उभारावे, या मागण्यांसाठी ते ठाम आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news