

Fraudsters Swindle ₹1.25 Crore by Luring Investors with Promises of a 12% Return on Share Market Investments
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केट, फॉरेक्स ट्रेडिंग, पेमॅक्स ग्लोबल लि. कंपनीत गुंतवणुकीवर दरमहा २ ते १२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून शहरातील अनेक नागरिकांची तब्बल १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गुरुप्रसाद शंकर चव्हाण, सुपर्णा गुरुप्रसाद चव्हाण (दोघे रा. विरार, मुंबई), विठ्ठल भागाजी तांदळे (रा. सुरेवाडी), सुधाकर शंकर खंडागळे (रा. येसगाव, खुलताबाद), तरुणा चव्हाण आणि सोनी मनचंदानी (दोघी रा. ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. या सहा जणांवर सिडको पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पदमा विश्राम सुस्ते (४३, रा. गारखेडा परिसर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे नातेवाईक विठ्ठल तांदळे यांनी त्यांना गुरुप्रसाद व सुपर्णा हे दोघे पेमॅक्स ग्लोबल लि. कंपनीशी निगडित स्कीममध्ये, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करतात.
त्यांच्याकडे गुंतवणूक केल्यास २ ते १० टक्के प्रतिमहिना परतावा दिला जातो, असे सांगितले. तांदळे आणि खंडागळे दोघांनी मिळून सौभाग्य चौक, जळगाव रोडवर, व्हिक्टरी ट्रेडर्स नावाने शेअर ट्रेडिंग कार्यालय सुरू केल्याचे सांगून साईड बिजनेस म्हणून करतो. नफा मोठ्याप्रमाणात होत आहे. चव्हाण दाम्पत्य व्यवस्थापक म्हणून काम करत असल्याचे सांगितले. पेमॅक्स कंपनीने एक नवीन इनव्-हेस्टमेंट स्किम सुरू केलेली असून, त्यामध्ये गुंतवणुकदारांना चांगले रिटर्न्स मिळत आहेत.
शहरातील नामांकित ऑटो कंपनीमधील बऱ्याच लोकांनी आमच्या मार्फत गुरूप्रसाद चव्हाण व सुपर्णा चव्हाण यांच्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. तसेच जवळपास ५० ते ६० लोकांनी या कंपनीमध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केली आहे. महिन्याला १०% ते १२% प्रमाणे परतावा मिळत आहे. तुम्ही तर माझ्या जवळचे आहात तुम्हीही गुंतवणूक करा, असे सांगून विश्वास संपादन केला. तुमचे पैसे व्याजासह मी परत करेल, असे आश्वासन देऊन आम्हालाही २ टक्के कमिशन मिळेल, असे सांगितले.
दुबई मॉरिशसला हेड ऑफिस
चव्हाण दाम्पत्याशी भेट घालून दिली. तिथे गुरुप्रसादने कंपनीचे दुबई व मॉरिशस येथे हेड ऑफिस असून, मुंबईत स्वतःचे कार्यालय असल्याची थाप मारली. आंतरराष्ट्रीय कंपनी असल्याचे सांगून, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. गुंतवणूकदारांची रक्कम इतर व्यवसायांमध्ये गुंतवण्यासाठी रिद्धी सिद्धी इंटरप्राईजेस, माताजी ट्रेडर्स, साईजी ट्रेडर्स, ज्युपीटर ट्रेडिंग स्टोअर, एसव्हिएस इंटरप्राईजेस, वृंदावन ट्रेडर्स, मॅजेस्टिक व्हेंचर्स, रूद्र अॅग्री सर्व्हिसेस, व्ही. आर. इंटरप्राईजेस, वुड झोन टिंबर फर्म, इनलाईफ कॅपशुअर एलएलपी, दिनेश ट्रेडर्स अशा विविध फर्मची स्थापना केल्याचे सांगितले.
सुस्ते यांनी ३१ जुलै २०२३ रोजी ५ लाख रुपये रिद्धी सिद्धी इंटरप्राईजेस या फर्मच्या खात्यात जमा केले. सुरुवातीचे ३-४ महिने आरोपींनी परतावा दिला, मात्र त्यानंतर पैसे देणे बंद केले. पैसे परत मागितले असता आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. कॉल उचलणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सिडको ठाण्यात सुस्ते यांनी बुधवारी (दि. २५) तक्रार दिल्याने पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी गुन्हा दाखल करून घेत आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला.
अनेकांना घातला गंडा
प्रकाश मानकर (३० लाख), सुदाम नागरे (१५ लाख), गुलाब पवार (१२ लाख), रतनसिंग राजपूत (११.५ लाख), मिलिंद ३ म्हस्के (१० लाख), नथू कोल्हे (१० लाख), साहेबराव कांडेकर (५.५ लाख), अरविंद दापूरकर (५ लाख), रघुनाथ सुलताने आणि हरिचंद्र शेवाळे (प्रत्येकी ३ लाख) सोनापंत कावळे (२.५ लाख) या सर्व गुंतवणूकदारांची मिळून एकूण १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाली. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार करत आहेत.