

Father drowns in Pokhari lake while saving son
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा आनंद उत्साह आणि भक्तिभावाने सुरू असलेल्या गणेश विसर्जनाच्या सोहळ्यात शनिवारी (दि.६) दुर्दैवी घटना घडली. पोखरी तलावात ४८ वर्षीय रुग्णवाहिका चालकाचा बुडून मृत्यू झाला. मुलाचा जीव वाचवताना पित्याला प्राण गमवावा लागल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
सुधीर काशीनाथ मेणे (४८, रा. श्रीरामपूर, ह.मु. पोखरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुधीर मेणे घाटीत रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत होते. शनिवारी रात्री ड्यूटी असल्याने त्यांनी कुटुंबीयांसोबत घरातील गणपतीचे विसर्जन पोखरी तलावात केले. विसर्जनानंतर ते तलावात पोहत होते. त्याचवेळी ११ वर्षीय मुलाचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला.
तात्काळ सुधीर यांनी मुलाला बाहेर काढून जीव वाचविला, परंतु त्याच क्षणी त्यांचा पाय घसरला आणि ते खोल पाण्यात पडले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई व तीन बहिणी असा परिवार आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, जमादार गोरे पुढील तपास करत आहेत.