

पैठण : पैठण शहरातील नागेबाबा बँक दरोड्यातील आरोपी, भावाचा खून आणि पोलिसांवर हल्ला करणारा कुख्यात गोरख विठ्ठल लोखंडे याने आपल्या अल्पवयीन मुलीवरच वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार चितेगाव परिसरात उघडकीस आला आहे.
आरोपीने मुलीला धमकी देत हा प्रकार गुप्त ठेवण्यास भाग पाडले होते. अखेर पीडित मुलीच्या आईने धाडस दाखवत बिडकीन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करताच आरोपी फरार झाला होता. मात्र, पोलिसांच्या पिंकू पथकाच्या शिताफीने आरोपीला राजापूर (ता. पैठण) येथे सापळा रचून अटक करण्यात आली.
गोरख विठ्ठल लोखंडे (रा. भागाजीनगर, चितेगाव, ता. पैठण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोखंडे याचा गुन्हेगारी इतिहास गंभीर असून, तो नागेबाबा मल्टी बँक दरोड्यातील आरोपी आहे. याशिवाय, कोरोना काळात त्याने आपल्या सख्ख्या भावाचा खून केला होता. पोलिसांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांवर देखील हल्ला करून दोन कर्मचाऱ्यांना गंभीर जखमी केले होते.
चितेगाव येथील कंपनीत काम करणारा लोखंडे आपल्या घरात मुलगी एकटी असताना तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत, त्याने पीडितेला भयभीत केले होते. अत्याचाराची घटना दिवसेंदिवस वाढत असताना, ९ जून रोजी रात्री पीडित मुलीच्या आईने हा धक्कादायक प्रकार पाहिला आणि तिने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली.
बिडकीन पोलिस ठाण्याचे सपोनि. निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला गुन्ह्याची माहिती मिळताच तो फरार झाला होता. मात्र, सपोनि जनाबाई सांगळे आणि पोना संतोष तोडकर यांच्या पिंकू पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे राजापूर परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली. या घटनेमुळे पैठण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.