

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारकडून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उशिराने अनुदान मंजूर झाले. तरीही जिल्हा प्रशासनाने या अनुदान वाटपात गती घेतली आहे. चार दिवसांत जिल्ह्यातील तब्बल २ लाख ५० हजार ६८२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तब्बल १८९ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. आतापर्यंत ४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत.
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केले. छत्रपती संभाजीनगर वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांना दिवाळीपूर्वीच अनुदान मंजूर झाले. त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांन अनुदान वितरणास सुरुवात झाली, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला दिवाळीनंतर म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी ४८० कोटींचा निधी मंजूर झाला. त्याचा अध्यादेश ३० ऑक्टोबर रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला. परंतु उशिराने अनुदान मंजूर होऊनही प्रशासनाच्या नियोजनामुळे जिल्ह्यात अनुदान वाटप वेगाने सुरू झाले आहे.
चारच दिवसांत जिल्ह्यातील अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना १८९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात एकूण ६ लाख ४४ हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. त्यासाठी आतापर्यंत ४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. त्यातील अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली असून, राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मार्गदर्शनाखाली अनुदान वाटपाची तयारी आधीच करून ठेवण्यात आली होती. अध्यादेश जारी होताच अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झाली. चारच दिवसांत अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच मदत वितरित होणार आहे.
जनार्धन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी.
शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम
अनुदान वाटपासाठी शासनाच्या पोर्टलवर शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत खुलताबाद तालुक्यात सर्वाधिक ९० टक्के लाभार्थीच्या याद्या अपलोड झाल्या आहेत. त्यापोठापाठ सोयगाव तालुक्यात ८७ टक्के, गंगापूर तालुक्यात ८३ टक्के, फुलंब्री तालुक्यात ७० टक्के आणि कन्नड तालुक्यात ७३ टक्के लाभार्थीच्या याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगर आणि पैठण या दोन तालुक्यांमध्ये मात्र सरासरी ५० ते ५५ टक्के लाभार्थीच्या याद्या अपलोड झाल्या आहेत. याद्या अपलोड झाल्यानंतरच शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत जमा होत आहे.