

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जागतिक स्तरावर ड्रोन प्रशिक्षणाची वाढती मागणी आणि भारतातील वाढत्या ड्रोन क्षेत्रातील पार्श्वभूमी लक्षात घेऊन, कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेला जिल्ह्यातील पहिले रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा मान मिळाला आहे. केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालया (डीजीसीए) तर्फे या केंद्राला मान्यता देण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाची मोठी संधी उपल्बध झाली आहे.
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेमधील ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र हे शहरातील पहिले प्रशिक्षण केंद्र आहे. ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये व्यवसाय करणाऱ्या तरुण पिढीला रिमोट पायलट प्रमाणपत्रामुळे ड्रोन क्षेत्रात करिअरची व रोजगाराची संधी मिळणार आहे. या प्रशिक्षण - केंद्रामार्फत मराठवाड्यातील तरुणांना ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तसेच ड्रोन चालविण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय मार्फत परवाना देण्यात येणार आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष इंजि. रणजीत मुळे, सचिव पद्माकरराव मुळे आणि विश्वस्त समीर मुळे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, मनुष्यबळ विकास व्यवस्थापक अनिल तायडे आणि जनसंपर्क अधिकारी संजय पाटील, उपप्राचार्य डॉ. देवेंद्र भुयार यांनी कौतुक करत संपूर्ण संस्थेसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. केंद्राच्या मान्यतेसाठी डॉ. राजेंद्र शिंदे, प्रा. संजय कुलकर्णी, प्रा. सचिन लहाने, श्री. शिलम शास्त्रसु, प्रा. युवराज नरवडे यांच्यासह रवींद्र घाटे यांनी परिश्रम घेतले.