

छत्रपती संभाजीनगर: पुढारी वृत्तसेवा : 'मुलांशी काय भिडताय, हिंमत असेल तर बापाशी भिडा', असे थेट आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना रविवारी दिले. सध्या त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ते बिथरले आहेत, म्हणून ते अशी वक्तव्ये करीत आहेत, असेही ते म्हणाले.
कल्याण-डोंबिवली येथील शिवसेना शिंदे गटाच्या सात माजी नगरसेवकांनी रविवारी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधत त्यांचा उल्लेख 'मुख्यमंत्र्यांचं कारटं' असा केला.
याबाबत छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रकारांनी विचारणा केली. त्यावर ते म्हणाले, हिऱ्यापोटी गारगोटी असं मी नेहमी म्हणतो ते हेच उदाहरण आहे. आम्ही त्यांच्या आरोपांना उत्तर देणार नाही तर कामातून उत्तर देऊ, लाडकी बहीण योजनेमुळे मविआच्या नेत्यांना धडकी भरली आहे, असेही शिंदे म्हणाले.