

संभाजीनगर : नशेचा बाजार करण्यासाठी आरोपींनी शक्कल लढवून ‘डॉक्टर सॅम्पल नॉट फॉर सेल’ असे टॅग लावून कुरियरच्या मार्फत पार्सल शहरापर्यंत पोचविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक - पथकाने पाळेमुळे खोदण्यास सुरुवात केल्याने त्यांना शनिवारी नाशिक येथून एका कुरियर कंपनीकडून ९०० बाटल्या जप्त करण्यात मोठे यश आले आहे.
आरोपीने अटकेपूर्वी नशेच्या बाटल्यांचा माल नाशिक येथे ग्वालियरवरून कुरियर कंपनीच्या मार्फत आला होता. अमली पदार्श प्रतिबंधक पथकाने नशेच्या गोळ्या आणि सिरप विक्री करणाऱ्या रेशमा अंजुम, शहरातील पेडलर यूसुफ खान, नाशिकचा मेडिकल दुकानदार प्रवीण गवळी आणि मालाचा पुरवठा करणारा ग्वालियर, मध्यप्रदेश येथील निशांतकुमार अशोक कुमार सक्सेना यांना अटक केली आहे. हे आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. या आरोपींकडून आतापर्यंत १३ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान तपासामध्ये आरोपी प्रवीण गवळी आणि निशांत सक्सेना यांच्याकडे आणखी काही अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती पथकाला चौकशीत मिळाली. त्यावरून पथकाने कसून चौकशी केली. निशांतकुमार याने आपण काही दिवसांपूर्वी नशेच्या बाटल्याचा साठा एका कुरियर कंपनीच्या मार्फत पाठवल्याची माहिती दिली. पोलिसांनी गवळीकडे चौकशी केली असता त्याने आपल्याला माहिती नसून हा माल कुरियर कंपनीकडे असल्याची शक्यता व्यक्त केली. या माहितीवरून पथकाने नाशिक गाठत कुरियर कंपनीकडे चौकशी केली. त्यांच्याकडे हा माल आल्याची माहिती मिळाली. पथकाने ९०० बाटल्यांचा हा साठा जप्त करीत शहरात आणला. पोलिस निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, संदीप शिंदे यांच्या पथकाने केली.
पोलिसांनी जप्त केलेल्या बाटल्यांवर ‘नॉट फॉर सेल असे टॅगिंग’ केलेले आहे. त्यातील अनेक बॅच नंबर खाडाखोड केलेले आहेत. विशेष म्हणजे विना बिलाचा माल हवाय अशी मागणी यूसुफ करायचा त्यामुळे हा माल डॉक्टर सॅम्पल असे टॅग करून शहरात यायचा. या टॅगमुळे कुरियर करण्यास अडचणी येत नसल्याचे आरोपींनी पोलिसांना कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी डेलीवेरी या कुरियर कंपनीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.