वैजापूर : गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित पक्षप्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. आज (दि.25) दुपारी बारा वाजता मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. दिनेश परदेशी यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
काही दिवसांपूर्वी वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने ते पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर वैजापूरमध्ये ठाकरेंचा उमेदवार कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच ठाकरेंनी शिंदेंच्या आमदाराला पराभूत करण्यासाठी वैजापूर भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांचा १४ सप्टेंबर रोजी वैजापूर येथे झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात पक्ष प्रवेश होणार असल्याचे वृत्त होते. तसेच त्यांच्या समर्थकांकडून तशा पोस्टही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल केल्या गेल्या होत्या. मात्र काही कारणामुळे हा पक्ष प्रवेश रखडल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता.
मात्र त्याच्या पक्षप्रवेशाला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे. कारण परदेशी हे आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास मातोश्रीवर अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह, शेकडो समर्थकांना घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहे. त्यासाठी डॉ. दिनेश परदेशी यांच्यासह त्यांचे समर्थक रात्रीपासून मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.
सन 2001 पासून ते जवळपास आतापर्यंत वैजापूर नगरपालिकेवर डाॅ. परदेशींची एकहाती सत्ता राहिली आहे. तसेच परदेशींनी काँग्रेस कडून यापूर्वी दोनदा विधानसभा लढवली आहे. या दोन्हीही निवडणुकीत परदेशींना अगदी थोडक्या मताने पराभवाच्या छायेत राहावे लागले आहे. तसेच शिंदेचे विद्यमान आमदार बोरनारे यांना आव्हान उभे करणाऱ्या उमेदवारांची यादी. परदेशींचे नाव नेहमी आघाडीवर राहिले.