

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व होते. ते शिक्षणांबरोबरच विद्यार्थ्यांवरही जिवापाड प्रेम करत असतं. याचाच प्रत्यय नोव्हेंबर १९५५ मध्ये छत्रपती संभाजीनगरात (त्यावेळचे औरंगाबाद) मुक्कामी असताना आला होता. त्यांची प्रकृती अस्वस्थ असतानाही केवळ विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्यापोटी बाबासाहेबांनी धम्मपदात होणाऱ्या द्वेश-मूलक (दुष्ट) आणि प्रेम-मूलक (प्रेमळ) क्रोधावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. यातूनच बाबासाहेबांचा शिक्षण आणि विद्यार्थ्यांप्रती असलेला जिव्हाळ्याचा प्रसंग समोर येतो.
ऑक्टोबर १९५५ मध्ये बाबासाहेब डॉ. सविता आंबेडकर यांच्यासोबत विश्रांती व मिलिंद कॉलेजच्या संबंधित काही कामांसाठी आले होते. ते रेल्वे हॉटेल (अशोका हॉटेलचे ठिकाण) मध्ये मुक्कामी होते. त्याच दरम्यान मिलिंद कॉलेजचे प्राचार्य चिटणीस यांनी विद्यार्थ्यांचे बोधी मंडळ स्थापन केले होते. या मंडळाने बाबासाहेबांना बौद्ध धर्मावर व्याख्यान द्यावे, अशी गळ घातली. या मंडळाचे सचिव होते वराळे यांचे पुत्र भालचंद्र वराळे. दरम्यान प्रकृती अस्वस्थ असल्याने बाबासाहेबांनी ते आमंत्रण नाकारले.
त्या काळात भालचंद्र हे बाबासाहेबांचे आवडते विद्यार्थी होते. तरीही त्यांनी हे आमंत्रण नाकारल्याने विद्यार्थी निराश झाले. ते विविध पद्धतीने बाबासाहेबांना मनवण्याचा प्रयत्न करत होते. बाबासाहेबांनी नकार दिला तरी ते विद्यार्थ्यांसाठी येणारच ही शाश्वती धरुन त्यांनी हार-तुरे आणून कार्यक्रमाची तयारी केली. कार्यक्रम दुसऱ्या दिवशी असल्याने एक दिवस आगोदर भालचंद्र वराळे कार्यक्रमांची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याकडे गेले. त्यावेळीही नकार देत हार-तुऱ्यांसाठी केलेला खर्च त्यांना देऊन टाका आणि ही किटकिट मिटवा, अशा शब्दात बाबासाहेबांनी फटकारले. तरीही भालचंद्र यांनी आशा न सोडता प्रयत्न केला व याला सविताताई आंबेडकरांच्या मध्यस्थीमुळे यश मिळाले. प्रकृती अस्वस्थ असतानाही बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांसमोर नोव्हेंबर १९५५ मध्ये धम्मपदात होणाऱ्या द्वेश-मूलक (दुष्ट) आणि प्रेम-मूलक (प्रेमळ) क्रोध याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांप्रति आपली भावना यातून प्रकट केली. हा प्रसंग डॉ. सविता आंबेडकर यांच्या डॉ. आंबेडकरांच्या सहवासात या पुस्तकात आहे.
आजारी असतानाही बाबासाहेबांनी नोव्हेंबर १९५५ मध्ये विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्याख्यान दिले. दुर्दैवाने ज्या विद्यार्थ्यांचे सर्वात जास्त कौतुक करायचे त्यांच्यासाठी हे शेवटचे व्याख्यान ठरले, अशी माहिती आंबेडकरी अभ्यासक डॉ. राजेश रगडे यांनी दिली.
महाविद्यालये चालवण्यासाठी बाबासाहेबांना पैशाची चणचण भासत होती. याच दरम्यान त्यांनी मदतीचे आवाहन केले होते. योगायोग म्हणजे अभिनेता दिलीपकुमार नोव्हेंबर १९५५ मध्ये बाबासाहेब ज्या ठिकाणी थांबले होते. त्या रेल्वे हॉटेलमध्येच उतरले होते. त्यांनी बाबासाहेबांना मदतीसाठी हाथ पुढे केला. परंतू, बाबासाहेबांनी त्यांची मदत नाकारल्याचाही उल्लेख सविताताई आंबेडकरांच्या पुस्तकात आहे.