

जे. ई. देशकर छत्रपती संभाजीनगर- घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी या म्हणीप्रमाणेच बौद्ध धम्मातील पंचशीलबाबत जागतिक पातळीवर झालेले वक्तव्य व त्यातून निघणारा अन्वयार्थ जाणून घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तळमळ कशी होती त्यांनी भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या महासचिवांना पाठवलेल्या पत्रांवरून दिसून येते.
१९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील नागसेनवनात मुक्कामी होते. त्यादरम्यान त्यांची प्रकृतीही थोडी अस्वस्थ होती. त्या परिस्थितीत त्यांच्या ऐकण्यात तसेच वाचण्यात आले की, बुल्गानिन, खुश्चेव्ह आणि सौदी अरेबियाचे राजे यांनी पंचशीलबाबत काही वक्तव्य केले होते.
तसेच चीनचे पंतप्रधान चौ-एन-लाई जेव्हा भारतात आपल्या पंतप्रधानांना भेटण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांनीही पंचशीलबद्दल उद्गार काढल्याचे वाचले होते. तर या चार जणांनी पंचशीलबाबत नेमके काय विश्लेषण केले याची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी ९ डिसेंबर १९५५ साली भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे महासचिव एन. आर. पिल्लई, आय. सी. एस. यांना पत्रव्यवहार केला होता.