

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी रेल्वे ब्रॉडगेज, विमानतळ विस्तारीकरण आणि मुंबईचे अंतर कमी करण्यासाठी पर्यायी रस्ता या तीन मागण्या सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्या होत्या, असा दावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख दिवंगत डॉ. कमलाकर ठकार यांनी एका मुलाखतीत केला आहे. चाळीसएक वर्षापूर्वी घेण्यात आलेल्या दुर्मिळ मुलाखतीचा व्हिडिओ यूट्यूबवर प्रसारित करण्यात आला आहे.
'वाल्मी' संस्थेत तेव्हा कार्यरत असणारे प्रा. डॉ. शरद भोगले यांनी १९८२ च्या सुमारास ठकार यांची मुलाखत घेतली होती. ठकार हे १९५० ते ६१ या काळात मिलिंद महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यानंतर जवळपास तीस वर्ष विद्यापीठात कार्यरत होते. मराठवाड्याशी संबंधित जिव्हाळ्याच्या या तिन्ही मागण्या जवळपास पूर्ण झालेल्या असताना त्यात बाबासाहेबांचे योगदान मुलाखतीमधून अधोरेखित करण्यात आले आहे.
बाबासाहेबांकडून प्रथम ब्रॉडगेजची मागणी करण्यात आली होती. मिलिंदमध्ये असताना तत्कालिन प्राचार्य डॉ. म.भि.चिटणीस हे शहरात नव्हते. तेव्हा बाबासाहेबांचे दिल्लीहून एक पत्र आले होते. त्यात त्यांनी रेल्वे उपमंत्री शाह नवाझ खान हे संभाजीनगरात येणार आहेत. त्यांना भेटून ब्रॉडगेजचे निवेदन देण्यात यावे, त्यानुसार आम्ही काही प्राध्यापकांनी मंत्र्यांना देण्यासाठी निवेदन तयार केले आणि शाह नवाझ यांच्याकडे सुपुर्द केले, असे ठकार यांनी मुलाखतीत म्हटले आहे. तसेच मराठवाड्याचे मागासलेपण दूर होण्यासाठी ब्रॉडगेज किती आवश्यक आहे, असे त्यात नमूद करण्यात आले होते. शाह यांनी अशा प्रकारची मागणी प्रथमच आली असल्याने दिल्लीत गेल्यानंतर त्यावर विचार करू, असे सांगितले होते, असे या मुलाखतीत स्पष्ट करण्यात आले आहे.
केवळ रेल्वेच नाही तर संभाजीनगरात असणारे चिकलठाणा विमानतळ मोठे व्हावे, ही मागणी सर्वप्रथम बाबासाहेबांनी उचलून धरली. तेव्हा विमानतळावर साधे रनवे होते. त्यामुळे विस्तारीकरण करावे, असे निवेदन बाबासाहेबांनी केंद्राला पाठविले होते. तसेच मुंबई ते संभाजीनगर शहराचा रस्ता दुरचा आहे. या रस्त्याचे अंतर कमी व्हावे, असे त्यांना वाटत असे. त्याचा अभ्यास करून बाबासाहेबांनी आराखडा तयार केला होता. त्यामुळे मुंबईचे अंतर बर्यापैकी कमी होईल, असे ते म्हणतं.
संभाजीनगरात कोणी मान्यवर आले तर त्यांनी मिलिंद महाविद्यालयाला भेट द्यावी, असा बाबासाहेबांचा आग्रह असे. तेव्हा माजी अर्थमंत्री सी.डी.देशमुख हे युजीसीचे चेअरमन होते. त्यांनी मिलिंदला भेट द्यावी, अशी बाबासाहेबांची इच्छा होती. देशमुख हे सपत्नीक आले होते. त्यांनी कॉलेजसाठी काय गरजेचे आहे ? असे विचारले असता मुलींसाठी हॉस्टेल असावे, असे मी सांगितले. कारण नांदेड असो वा संभाजीनगर येथे स्वतंत्र वसतिगृह नव्हते. देशमुख यांनी ही मागणी लगेच मंजूर करून शंभर टक्के अनुदान मंजूर केल्याची माहितीही ठकार यांनी मुलाखतीत दिली आहे.