

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत विविध प्रकारच्या मिठाई घेण्यासाठी नागरिक पसंती देत असताना सायबर पोलिसांनी मिटमिटा येथे छापा मारून तब्बल ४२५ किलो भेसळयुक्त खवा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई ३० ऑक्टोबर रोजी दिव्यांश मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट येथे करण्यात आली.
गिरेन सिंग बच्चनलाल सिंग असे आरोपीचे नाव आहे. विशेष मी म्हणजे त्याच्याविरुद्ध यापूर्वी देखील भेसळयुक्त खवाप्रकरणी छावणी पोलिसात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिटमिटा भागातील उस्मानिया कॉलनी येथे दिव्यांश मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट येथे भेसळयुक्त खवा बनत असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती.
त्यांनी छापा मारून पाहणी केली. तेव्हा तिथे स्वस्त साहित्य, मिल्क पावडर, वनस्पती तूप, खाद्यतेल आणि खातासोडा याचा वापर करून झटपट प्रक्रियेद्वारे तयार केला जात असल्याचे आढळून आले. मोठ्याप्रमाणावर भेसळयुक्त खव्याचे उत्पादन करून तो दुधापासून बनविला असल्याचे भासवून बाजारात विक्री केला जात असल्याचेही समोर आले आहे.
पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी सुलोचना जाधवर यांना तत्काळ बोलावून घेत तपासणी करण्यात आली. पोलिसांनी ४२५ किलो खवा जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप शिंदे, सागर पाटील, अंमलदार सतीश हंबर्डे, अशरफ सय्यद, विनोद परदेशी, रंजक सोनवणे, सोहेल पठाण यांनी केली.