

Discussions between the Shiv Sena and BJP for the grand alliance are still ongoing.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महायुतीसाठी शिवसेना-भाजपामध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असून शुक्रवारी मध्यरात्री महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक कोअर कमिटीची बैठक होऊनही निर्णय झाला नाही. अखेर शनिवारी (दि. २७) तब्बल सात तास माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. भागवत कराड यांच्या निवासस्थानी कोअर कमिटी सदस्यांची मॅरेथॉन बैठक झाली. त्यात ८७ पैकी ७२ जागांवरच एकमत झाले. मात्र १५ वॉडांवर तिडा कायम राहिल्याने अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
या प्रभागात तिढा कायम
प्रभाग क्रमांक २२, आणि २७ यातील सर्वच म्हणजे ८ वॉर्डामध्ये तिढा कामय आहे. तर इतर चार प्रभागांतील एक ते दोन वॉर्डावरून रस्सीखेच सुरू असल्याने एकमत होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
यावेळी ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार संजय केनेकर, आमदार अनुराधा चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, किशनचंद तनवाणी, माजी महापौर विकास जैन, समीर राजूरकर, ऋवनीकेश जैस्वाल यांची उपस्थिती होती. महायुतीसाठी मागील दोन आठवड्यांपासून शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे.
आठ बैठका झाला असून त्यातील एक बैठक ही महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. दिवसभर मराठवाड्यातील भाजप पदाधिकार्यांकडून नांदेड, परभणी, जालना, लातूर आणि संभाजीनगर या पाच महापालिकांतील युतीचा आढावा घेतल्यानंतर मध्यरात्री १२.३० वाजता बावनकुळे हे मंत्री शिरसाट यांच्या निवासस्थानी गेले.
तब्बल दोन वाजेपर्यंत मंत्री बावनकुळे, सावे आणि शिरसाट यांच्यात जागा वाटपावर चर्चा झाली. त्यात काही जागांचा तिडा सामंजस्याने सोडविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शनिवारी पहाटेच मंत्री बावनकुळे हे मुंबईला रवाना झाले.
दरम्यान, शनिवारी सकाळी ९.३० वाजता भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी डॉ. कराड यांच्या निवासस्थानी एकत्र आले. त्यात ज्या ८७ वॉर्डामध्ये युती निवडणूक लाढविणार आहे. त्यावर सात तास चर्चा होऊन अखेर ७२ वॉर्डावर एकमत झाले. तर १५ वॉर्डाचा तिडा कायम राहिल्याने सविस्तर माहिती वरिष्ठ नेत्यांना पाठविली. त्यावर बोलताना पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, ज्या जागांवर एकमत झाले. त्याची माहिती आता वरिष्ठांना दिली आहे. आता युतीबाबत वरिष्ठ नेतेच निर्णय घेतली, असेही ते म्हणाले.
कोणाला किती जागा हव्यात
शहरातील ११५ पैकी ८७ वॉर्डात पूर्णतः हिंदू मतदार आहेत. तर उर्वरित २८ वॉर्ड हे दलित, मुस्लिम मतदार असलेले वॉर्ड असल्याने त्यात शिवसेना आणि भाजपचे प्राबल्य नाही. त्यामुळे युती ८७ वॉर्डावरच होत असून त्यात ४७ वॉडाँवर शिवसेनेने दावा केला आहे. अन् भाजपला ४० वॉर्डच देण्याची तयारी दर्शविली आहे