Chhatrapati Sambhajinagar accident: वेरूळ (माटेगाव) चौफुलीवर भरधाव ईको कारची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील वेरूळ (माटेगाव) चौफुली परिसरात भरधाव ईको कारने धडक दिल्याने रस्ता ओलांडणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
accident
accidentFile Photo
Published on: 
Updated on: 

Chhatrapati Sambhajinagar accident

वेरूळ : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील वेरूळ (माटेगाव) चौफुली परिसरात भरधाव ईको कारने धडक दिल्याने रस्ता ओलांडणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. २७) दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास 'हॉटेल अशोका'समोर हा भीषण अपघात घडला.

लक्ष्मण देवा चव्हाण (वय ६५, रा. भारंबा तांडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वेरूळ (माटेगाव) चौफुलीवरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

accident
Kolhapur Accident : मध्यरात्री निर्जन रस्त्यावर कार उलटली; ७ वर्षांच्या राजवर्धनमुळे कुटुंबीयांना जीवदान!

रस्ता ओलांडताना काळाचा घाला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लक्ष्मण चव्हाण हे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्नडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी पांढऱ्या रंगाच्या 'मारुती सुझुकी ईको' कारने (क्र. एमएच ५४ बी ३३०६) त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. ईको कारचालक चेतन गडखांब (वय २६, रा. कोडगाव, ता. भडगाव, जि. जळगाव) हा भरधाव व निष्काळजीपणाने वाहन चालवत असल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

महामार्ग पोलिसांची घटनास्थळी धाव

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक नितेश इंद्रोले यांच्यासह सय्यद जफर, विकास चंदनसे, रामनाथ भुसारे, शरद दळवी आणि शांताराम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वेरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते मसीयोद्दीन सौदागर यांच्या रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी लक्ष्मण चव्हाण यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील 'घाटी' शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

माटेगाव चौफुली बनतेय अपघातांचा केंद्रबिंदू

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील माटेगाव चौफुली परिसरात सततची वर्दळ आणि वाहनांचा प्रचंड वेग यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिसरात यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. त्यामुळे या चौफुलीवरील वाहतुकीचे नियोजन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

उड्डाणपूल उभारण्याची मागणी

माटेगाव चौफुली परिसरात उड्डाणपूल उभारावा तसेच तोपर्यंत आवश्यक वाहतूक नियंत्रण व्यवस्था, दिशादर्शक फलक आणि इतर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. महामार्ग ओलांडताना नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत असल्याने संबंधित यंत्रणांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी खुलताबाद पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार मनोहर पुंगळे या अपघाताचा पुढील तपास करीत आहेत.

accident
Central Railway Accident Mumbai : मध्य रेल्वेच्या गोंधळात ३ मृत्यू ; नातेवाइकांच्या मदतीत कायदेशीर पेच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news