

छत्रपती संभाजीनगर : परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील गट नं. २४० मधील ६३.५० आर जमीन धाक-दपटशाही व कटकारस्थान रचून धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या भावंडांनी संगनमताने घरगड्याच्या माध्यमातून लुबाडल्याचा थेट आरोप सारंगी प्रवीण महाजन यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच फसवणुकीच्या आरोपाचा मुद्दा का उपस्थित करण्यात आला, या प्रश्नावर सारंगी महाजन यांनी आपण न्यायालयात जाण्याच्या संदर्भाने मुदत संपत असल्याचे सांगितले. या प्रकरणी तोडगा न निघाल्यामुळे अंबाजोगाईच्या दिवाणी न्यायालयात १८ ऑक्टोबर २०२४ रोजी दावा दाखल केला असून, त्यावर प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे. त्यावर २५ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
परळी शहर पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचेही सांगितले. जिरेवाडी येथील वरील जमीन पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीसमोर व परळी-बीड मार्गालगत असून, यातील २७ आर जागा ही शासनाने रस्ते विकास कामासाठी संपादित केलेली आहे.
उर्वरीत ३६.५० आर जमिनीचा व्यवहार हा धनंजय व पंकजा मुंडे यांच्या संगनमताने गोविंद बालाजी मुंडे या नोकराच्या माध्यमातून गोविंद माधव मुंडे, तानाजी दशरथ चाटे व पल्लवी दिलीप गिते (गोविंद बालाजी मुंडे यांची सून) यांचे नावे करून आपली व आपल्या कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला.