छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीने नरेटिव्ह परसवून लोकसभा निवडणुकीत मतांचा फायदा मिळविला. परंतु, विधानसभा निवडणुकीत परिस्थिती वेगळी राहणार आहे. राज्यात लाडक्या बहीण योजनेसह विविध कल्याणकारी योजना शेतकरी व नागरिकांसाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे याचा फायदा नक्कीच महायुतीला होईल आणि राज्यात पुन्हा सत्ता येईल, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. २४) छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात केले.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, संघटनमंत्री शिव प्रसाद, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, निवडणुकीचे अध्यक्ष रावसाहेव दानवे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आ. पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील सर्व विभागांत केंद्रीय मंत्री अमित शहा हे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन त्यांना प्रेरित करीत आहेत. लोकसभेत मराठवाड्यात भाजपचा अनपेक्षित निकाल लागला. या निवडणुकीत संविधान बदलणे यासह विविध प्रकारचे नरेटिव्ह पसरविले गेले. तसेच अनेक फॅक्टर एकत्रित झाल्याने महायुतीला अपयश आले. परंतु, विधानसभा निवडणुकीत परिस्थिती वेगळी आहे.
मराठवाडा हा भाजपसाठी महत्त्वाचा विभाग राहिला आहे. हा मोठा पराभव नाही. मात्र, तो मनाला लागणारा आहे, असेही फडणवीस म्हणाले. तेव्हाची स्थिती आणि आताची स्थिती यात बराच फरक आहे. मराठवाड्यात पहिल्यापेक्षा नकारात्मकता कमी झाल्याचे ते म्हणाले.
मराठा आरक्षणामुळे महाविकास आघाडीला फायदा झाला. त्यामुळे मी एकच सवाल महाविकास आघाडीला विचारतो. राज्यात त्यांचे सरकार आले तर मराठा समाजाला ते ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देतील का, हे त्यांनी लिहून द्यावे. असे होत असेल तर नक्कीच मनोज जाएंगे पाटील यांनी त्यांना सहकार्य करावे, असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, राज्यातील ४२ लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ करणार आहे. तसेच येत्या ३ दिवसांत ९३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीचे पैसे जमा केले जाणार आहेत. शेतकऱ्यांची काळजी राज्य सरकार घेत आहे. राज्यात पुन्हा भाजप सरकार आणायचे असेल तर २ कोटी ७५ लाख मतदान हवे आहे. आपल्या सरकारने राज्यातील २ कोटी ५० लाख महिलांना लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे वर्ग केले आहेत. त्यांच्यापर्यंत कार्यकत्यांनी पोहोचवावे. त्या नक्की भाजपला मतदान करतील, असेही ते म्हणाले.
भाजप हा कोण्या एका पदाधिकारी, नेत्याचा पक्ष नाही तर तो सर्व कार्यकत्यांचा पक्ष आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला
मराठवाड्यात एकही जागा कमी होणार नाही, या आत्मविश्वासाने मैदानात उतरा. विरोधकांना उत्तर देण्याची तयारी ठेवा, असा कानमंत्र त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. तसेच येत्या निवडणुकीत मराठा आंदोलनाचा थोडा परिणाम होईल, परंतु मराठा समाजाला भाजपनेच पहिल्यांदा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, असेही फडणवीस म्हणाले.