अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी कारवाईची मागणी

मुलीचा शोध लावावा ; मंत्री, राज्य महिला आयोगाला निवेदन
अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी कारवाईची मागणी
Published on
Updated on

गंगापूर: तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करून मुलीचा लवकरात लवकर शोध लावावा, अशी मागणी करण्यात आली असून, याबाबत महिला व बालकल्याण विभागाचे मंत्री तसेच राज्य महिला आयोग, महाराष्ट्र यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गंगापूर येथील अल्पवयीन मुलीला तांदूळवाडी येथील एकाने पुन्हा पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी सन २०२२ मध्येही आरोपीने याच मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र काही महिन्यांतच तो जामिनावर सुटल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, सदर मुलगी गेल्या साडेपाच महिन्यांपासून बेपत्ता असून, आरोपीने मुलीच्या वडिलांना मारहाण करून जबरदस्तीने तिला पळवून नेल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोधमोहीम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मुलीचा ठावठिकाणा लागलेला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

प्रमुख मागण्या

या गंभीर प्रकरणात आरोपीला तात्काळ अटक करून पोस्कोसह इतर कठोर कायद्याखाली गुन्हा नोंदवावा, विशेष पथकाद्वारे शोधमोहीम राबवावी, पोलिस यंत्रणेच्या कामकाजाचे परीक्षण करावे. तसेच पीडित कुटुंबाला सुरक्षा व कायदेशीर मदत द्यावी, अशा ठोस मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. महिला सुरक्षा संघटनेच्या राष्ट्रीय निरीक्षक जयश्रीताई घावटे ठुबे यांनी प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news