

Cyber fraudsters hacked an elderly man's mobile phone and siphoned off 7 lakh rupees
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पैठण रोड परिसरात राहणाऱ्या एका ७४ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीचा मोबाईल हॅक करून सायबर भामट्यांनी त्यांच्या दोन राष्ट्रीयीकृत बँक खात्यांसह क्रेडिट कार्डवरून परस्पर ७ लाख ३० हजार ४६३ रुपये ऑनलाइन हस्तांतरित करून फसवणूक केली. मोबाईलवर एकापाठोपाठ पैसे कपात झाल्याचे ई-मेल अलर्ट आल्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाने तातडीने बँकांशी संपर्क साधून खाती आणि क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. मात्र, बँकांकडून व्यवहार गोठविण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भामट्यांनी खात्यांतील रक्कम काढून घेतली होती. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीपकुमार बिश्वनाथ घोष (७४, रा. इंद्र अमृत ऑरेंज सिटी, पैठण रोड) यांच्या तक्रारीनुसार, ते पत्नी मोनंदिरा घोष यांच्यासह सातारा परिसरात राहतात. त्यांचा मुलगा बंगळुरू येथे नोकरीला असून, तो अधूनमधून घरी येत असतो. घोष यांचे आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) येथे बचत खाते आहे. तसेच, ते आयसीआयसीआय बँकेचे सॅफिरो क्रेडिट कार्ड वापरतात. त्यांच्या दोन्ही बँक खात्यांना मोबाईल क्रमांक जोडलेला आहे.
१४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घोष घरी असताना अचानक त्यांच्या बँक खात्यांमधून तसेच क्रेडिट कार्डवरून मोठ्या रकमेचे आर्थिक व्यवहार होत असल्याबाबत एकापाठोपाठ अनेक ई-मेल सूचना येऊ लागल्या. हे व्यवहार त्यांनी स्वतः केले नव्हते. तसेच, या व्यवहारांसाठी त्यांनी कोणालाही ओटीपी दिला नव्हता किंवा कोणत्याही व्यवहाराला मान्यताही दिली नव्हती.
बँक खाती ब्लॉक करेपर्यंत भामट्यांनी साधला डाव
मेसेज आणि ई-मेल पाहताच घोष यांनी तातडीने आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला. पुढील अनधिकृत व्यवहार रोखण्यासाठी त्यांनी दोन्ही बँक खात्यांमधील तसेच क्रेडिट कार्डवरील डेबिट व्यवहारांची सुविधा बंद करण्याची विनंती केली.
मात्र, बँकांशी संपर्क साधून खाती सुरक्षित करेपर्यंत अवघ्या काही तासांत, म्हणजेच रात्री ८ ते ११:४५ या वेळेत, सायबर भामट्यांनी ७ लाख ३० हजार ४६३ रुपयांचा डल्ला मारला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे करत आहेत. सायबर सेलच्या मदतीने ज्या बँक खात्यांमध्ये आणि मर्चेंट वॉलेट्समध्ये ही रक्कम हस्तांतरित झाली आहे, त्यांचा तांत्रिक माग काढला जात आहे.