

छत्रपती संभाजीनगर : निवृत्त प्राचार्य सायबर भामट्यांनी रचलेल्या डिजिटल चक्रव्यूहात अडकून आपल्या आयुष्यभराची तब्बल ३१ लाख ७ हजार रुपयांची कमाई अवघ्या दोन महिन्यांत गमावून बसले. ही घटना कटकटगेट परिसरात घडली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २१) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटकटगेट परिसरात राहणाऱ्या ६९ वर्षीय निवृत्त प्राचार्यांच्या मोबाईलवर ७ ऑक्टोबर २०२५ रोजी एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप मेसेज आला. भामट्यांनी त्यांना अत्यंत शिताफीने व्हीआयपी-११३ मेंबर्स ओन्ली आणि ए ३८० सुंदरम मार्केट मास्टर्स या दोन व्हॉट्सअॅप ग्रुपची लिंक पाठवून त्यात जॉईन केले. या ग्रुपवर शेअर बाजारातील भरघोस नफ्याच्या खोट्या गप्पा मारल्या जात होत्या. याच दरम्यान कायरा शर्मा नावाच्या एका महिलेने प्राचार्यांना फोन करून त्यांना जाळ्यात ओढले आणि SDAMC नावाचे बनावट ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले.
५ हजारांचे आमिष अन् ३१ लाखांचा गंडा
सुरुवातीला प्राचार्यांनी केवळ ५ हजार रुपये गुंतवले. भामट्यांनी अॅपवर या रकमेवर मोठा नफा झाल्याचे भासवून त्यांचा विश्वास जिंकला. त्यानंतर त्यांना SDAMCHD हे दुसरे अॅप घ्यायला लावले. नफ्याच्या आमिषाला भुलून प्राचार्यांनी २२ ऑक्टोबर ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत आपली साठवलेली सर्व रक्कम पणाला लावली. त्यांनी फोन-पे द्वारे २ लाख ५७ हजार रुपये आणि कोटक महिंद्रा, अॅक्सिस तसेच एचडीएफसी बँकेच्या खात्यावरून आरटीजीएस द्वारे २८ लाख ५० हजार रुपये असे एकूण ३१ लाख ७ हजार रुपये भामट्यांच्या खात्यात जमा केले.
नफा फक्त स्क्रीनवर; खात्यात ठणठणाट
प्राचार्यांनी गुंतवलेल्या या ३१ लाखांवर अॅपच्या स्क्रीनवर लाखोंचा नफा दिसत होता. जेव्हा त्यांनी ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अॅपमधून एरर येऊ लागला. त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नेहमी गोड बोलणाऱ्या कायरा शर्मानेही त्यांचा नंबर ब्लॉक करून टाकला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जिन्सी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत करत आहेत.