

Custard apple orchard spanning three acres destroyed due to drought
वरठाण, पुढारी वृत्तसेवा : सततची दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत असताना, वाडी (ता. सोयगाव) येथील शेतकरी पुनित नितीन बोरसे यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. पाण्याअभावी सीताफळ बाग जगवणे अशक्य झाल्याने त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने तीन एकर क्षेत्रातील सुमारे १ हजार १०० सीताफळाची झाडे मुळासकट उपटून टाकली. सहा वर्षे मेहनत करून जोपासलेली बाग डोळ्यांदेखत उद्ध्वस्त करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
पुनित बोरसे यांनी सहा वर्षांपूर्वी कर्ज काढून बनोटी शिवारातील गट क्रमांक १०५ मध्ये तीन एकर क्षेत्रावर सीताफळाची लागवड केली होती. सुमारे १ हजार १०० कलमांची लागवड करून त्यांनी मोठ्या आशेने बाग फुलवली. रात्रंदिवस मेहनत घेत खत, औषधे, पाणी आणि मजुरीवर खर्च करून त्यांनी बागेची जोपासना केली. कालांतराने बाग चांगली बहरली होती. त्यामुळे या बागेतून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती.
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पावसाने दडी मारल्याने परिसरात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. विहिरीने तळ गाठल्याने सीताफळाच्या झाडांना पुरेसे पाणी मिळेनासे झाले. परिणामी, झाडांना अपेक्षित फळधारणा झाली नाही. काही झाडांवर लागलेली फळेही पाण्याअभावी सुकून गळून पडू लागली. त्यातच उरलेल्या फळांवर मिलीबग किडीचा प्रादुर्भाव झाल्याने महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत होती.
एका बाजूला पाण्याची कमतरता, तर दुसऱ्या बाजूला खत, औषधे आणि मजुरीचा वाढता खर्च यामुळे बाग सांभाळणे आर्थिकदृष्ट्या परवडेनासे झाले. बागेतून मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्चही भरून निघत नसल्याने अखेर बोरसे यांनी कठोर निर्णय घेतला. डोळ्यांत पाणी आणून त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने तीन एकरांतील सुमारे १ हजार १०० सीताफळाची झाडे मुळासकट उपटून टाकल सहा वर्षे कष्ट करून उभी केलेली बाग नष्ट झाल्याने आणि लागवडीसाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा कायम असल्याने बोरसे यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतीत केलेली गुंतवणूक वाया गेल्याने पुढील उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
प्रशासनाने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी
दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे झालेल्या नुकसानीची प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामा करावा. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी पुनित बोरसे यांनी केली आहे.