

Contractual recruitment in the municipal corporation's health department mired in controversy
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आरोग्य विभागातील २८ पदांच्या कंत्राटी भरतीवरून वाद निर्माण झाला आहे. सुरुवातीला महिला उमेदवारांना मुलाखतीची संधी नाकारण्यात आली. त्याविरोधात महापौर समीर राजूरकर यांच्याकडे दाद मागितल्यानंतर त्यांच्या आदेशाने मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, शुक्रवारी (दि.२०) जाहीर झालेल्या अंतिम निवड यादीत तक्रार करणाऱ्या दोन महिलांची नावेच नसल्याने भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या उमेदवारांनी अतिरिक्त आयुक्तांकडे धाव घेत भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य कर्मचारी आणि स्वच्छता निरीक्षकांच्या २८ कंत्राटी पदांसाठी गेल्या महिन्यात मुलाखती घेण्यात आल्या. या पदासाठी २९ जून २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही सर्व पदे पुरुषांसाठी असल्याचे सांगून महिला उमेदवारांना संधी नाकारण्यात आली. दरम्यान, याच पदासाठी काही महिलांकडून अर्जासाठी २०० रुपये शुल्क आकारण्यात आले होते.
मात्र मुलाखतीत डावलण्यात आल्याने सुकेशनी गायकवाड, प्रियांका गंगावणे यांच्यासह काही महिलांनी महापौर समीर राजूरकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यानंतर महापौरांच्या आदेशाने महिला उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दरम्यान, शुक्रवारी ११२ उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यातून २८ जणांची अंतिम निवड करण्यात आली.
यात तीन महिलांचाही समावेश आहे. मात्र, महापौरांकडे दाद मागणाऱ्या गायकवाड आणि गंगावणे यांची नावे अंतिम यादीतून वगळण्यात आली. या प्रकारानंतर दोघींनी अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. कोणताही कामाचा अनुभव नसलेल्यांची निवड करण्यात आली, तर महापालिकेत यापूर्वी काम केल्याचा अनुभव आणि त्यासंबंधीची प्रमाणपत्रे जोडूनही आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
कुटुंबासह उपोषणाचा इशारा
समाजशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणासह फायरमन, एमएस-सीआयटी आणि एम.एस्सी. अशा शैक्षणिक पात्रता असूनही निवड का झाली नाही, असा सवाल गायकवाड आणि गंगावणे यांनी उपस्थित केला आहे. निवड झालेल्या २८ जणांपैकी काही महिला मुलाखतीसाठी उपस्थितही नव्हत्या, असा त्यांचा दावा आहे. या प्रकरणाची दखल न घेतल्यास कुटुंबीयांसह उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.