

Contractual employees met the Commissioner and presented him with a lamp of hope
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जीवनात प्रकाशाचा किरण आणण्याचा केलेला संकल्प प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करत अनेक वर्षांपासून अस्थिरतेच्या आणि आर्थिक अडचणींच्या गर्तेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेत-लेल्या निर्णयांमुळे नवचैतन्य लाभले असून मंगळवारी (दि. २१) सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आशेचा दिवा भेट देण्यात आला. हा दिवा प्रज्वलित करत आयुक्त म्हणाले, हा दिवा मी कधीही विझू देणार नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर करण्याचा माझा संकल्प आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना दिले.
मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी धडाकेबाज निर्णय घेत अल्पावधीतच कर्मचाऱ्यांच्या हितासाठी निर्णायक पावले उचलली. त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवून, त्यांना त्यांच्या कामाच्या योग्य मोबदल्याचा हक्क मिळवून दिला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंगळवारी सर्व कामगारांच्या वतीने माहिती व जनसंपर्क विभागाचे रवींद्र खरात व करण साळवे यांनी जलश्री निवासस्थानी आयुक्त श्रीकांत यांची भेट घेत तसेच कंत्राटदारांच्या दडपणातून कामगारांची मुक्तता केली.
दरम्यान १७ सप्टेंबर रोजी मनपा मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात आपल्या भाषणात त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सर्व त्रासातून मुक्त करण्यात येईल असे म्हटले होते. त्यांनी याच दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन देऊन व त्यांना दिवाळी अगोदर त्यांचे दोन महिन्यांचे वेतन देऊन त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद यांच्यासह कामगारांची उपस्थिती होती.