

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
बनावट कागदपत्रे, स्वाक्षरी करून कर्मचाऱ्याने बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून तब्बल ८० लाख ३६ हजार २६ रुपयांची रक्कम हडपली. हा प्रकार ३० एप्रिल २०२४ ते २७ मे दरम्यान बँक ऑफ बडोदाच्या उस्मानपुरा शाखेत घडला. फिरोज खान मुनाफ खान (रा. भारतनगर, गारखेडा) आणि बँक ऑफ बडोदा, उस्मानपुरा शाखेतील अधिकारी-कर्मचारी अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी सचिन शिवाजीराव देशमुख (४७, रा. निराला बाजार) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते शासकीय ठेकेदार आहेत. त्यांची शेख रफिक शेख मुनीर यांच्याशी भागीदारीत अमर इन्फ्रास्ट्रक्चर नावाने फर्म आहे. त्यांचे काल्डा कॉर्नर भागात कार्यालय आहे. जलसंधारण, जलसंपदा येथे बांधकाम ठेकेदाराचे काम करतात. त्यांच्या कार्यालयात आरोपी फिरोज खान हा कर्मचारी असून, कंपनी आणि बँकेसंबंधी कामे तो पाहतो. शासकीय कंत्राट घेण्यासाठी शासनाच्या खात्यात कंत्राटाच्या प्रमाणानुसार थर्ड पार्टी एफडीआर (ठेव) ठेवावी लागते. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी एफडीआर सोडविण्यासाठी ऑर्डर करतात. त्यानंतर बँक एफडीआर सोडवून रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा करते.
देशमुख यांच्या कंपनीने २०२४ साली जलसंपदा विभागाकडून कवडगाव रोड व पुलाचे काम घेतले होते. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या नावे बँक ऑफ बडोदाच्या उस्मानपुरा शेखच्या ३२ लाख ४४ हजारांची एफडीआर केली. त्याचे प्रमाणपत्र जलसंपदालाही दिले. काम पूर्ण झाल्यानंतर २० मे रोजी जलसंपदा अभियंता यांनी एफडीआर सोडविण्यासाठी प्रमाणपत्र दिले. त्यानंतर देशमुख यांनी कार्यालयातील विजय तांदळे या कर्मचाऱ्याला बँकेत पाठिवले. तेव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी एफडीआर रक्कम सोडविली असल्याचे सांगून कागदपत्रे दाखविली. ते सर्व कागदपत्रे बनावट होती. देशमुख आणि शेख यांच्या सह्या असलेले बॉण्ड, कार्यकारी अभियंता यांचे बनावट रिलीज ऑर्डर बनावट होते. त्यानंतर बँकेकडून एफडीआर सोडविल्यानंतर कंपनीच्या नावाचे चेक वटवून रक्कम काढण्यात आली. चेकवरही बनावट सह्या होत्या.
फिरोज शेख याला विचारणा केली तेव्हा त्याने एफडीआर पैकी १२ थर्ड पार्टी एफडीआर सोडविण्याची कबुली देऊन परस्पर पैसे घेतल्याचे सांगितले. तसेच सर्व बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर स्वतः सह्या केल्या. बँक अधिकाऱ्यांना पैसे देऊन परस्पर एफडीआर सोडविल्याचे सांगितले.
आरोपी फिरोज शेखने बँकेतून एफडीआर सोडविल्यानंतर चेकवर बनावट सह्या करून नातेवाइकांच्या खात्यावर रक्कम वळती केली. त्याने टप्प्याटप्प्याने ८० लाख ३६ हजार २६ रुपये हडप केले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक संभाजी पवार करत आहेत.