

Contractor booked for finding a sail in vegetables
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृतसेवा : समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी जेवण बनविल्यानंतर भाजीमध्ये पाल आढळून आल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी गृहप्रमुखाच्या तक्रारीवरून जेवण पुरवठ्याचे कंत्राट घेतलेल्या कंपनीतर्फे जेवण पुरविणाऱ्यावर शुक्रवारी (दि.२८) रात्री बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगिराज नागनाथअप्पा गौरश असे या कंत्राटदाराचे नाव आहे.
किले अर्क भागातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील जेवणामध्ये शिजलेली पाल आढळून आल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला होता. त्यामुळे २० ते २५ विद्यार्थ्यांना विषबाधा होऊन उलटी आणि मळमळ होऊ लागल्याने त्यांना घाटीत दाखल केले होते. या घटनेनंतर समाजकल्याण आयुक्त दीपा मुंडे यांनी वसतिगृहाची कसून तपासणी करीत दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. आयुक्त दीपा मुंडे यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त रवींद्र शिंदे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी बेगमपुरा पोलिसांना पत्र दिले होते.
त्यानंतर शुक्रवारी रात्री प्रभारी ग्रहप्रमुख आतीष ससाणे यांच्या तक्रारीवरून जेवण पुरवठा करणारी कंपनी डी.एम. एन्टरप्रायझेस जेव्ही ई व्हीथ ई गव्हनर्स सोल्यूशन प्रा.लि. चे स्थानिक प्रतिनिधी योगिराज नागनाथअप्पा गौरशेट्टे यांच्यावर जेवण बनवताना काळजी न घेतल्याचा, हलगर्जीपणा केल्याचा आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ शिवाजी वाडेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांना जेवण पुरविण्याचे कंत्राट मुंबई येथील डी.एम. एन्टरप्रायझेस जेव्ही ई व्हीथ ई गव्हनर्स सोल्यूशन प्रा.लि. यांना देण्यात आले आहे. मात्र कंपनी स्थानिकांना उपकंत्राट देत आहे. त्यामुळे जेवणाबाबत अनेक महिन्यांपासून तक्रारी येत आहेत.
दर्जा सुधारण्याबाबत अनेकवेळा पत्रही देण्यात आले. परंतु कारवाई झाली नाही. भाजीमध्ये पाल आढळून आल्याचे प्रकरण गंभीर असल्याने कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी शिफारस समाजकल्याण विभागाचे प्रादेशित उपायुक्त डॉ. दीपक खरात यांनी समाजकल्याण मंत्री, समाजकल्याण आयुक्त यांच्याकडे पात्रद्वारे केली आहे.