खुलताबाद, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील बाजार सावंगी येथील महाविद्यालयीन तरुणाचा पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू झाला. गौरव मनोहर जाधव (१७) असे या तरुणाचे नाव आहे.
बाजार सावंगी इथूनच जवळ असलेल्या शेखपूरवाडी शिवारातील विहिरीवर गौरव जाधव हा मित्रासोबत दुपारच्या वेळी दोनच्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता. मित्रांमध्ये कोणालाही पोहता येत नसल्याने तरीसुद्धा त्याने विहिरीमध्ये उडी मारली. पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. माहिती मिळाल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीमध्ये पाणी जास्त असल्याने कोणालाही त्याला काढणं शक्य झाले नाही.
बाजार सावंगी पोलिस पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले पण हे सर्व होईपर्यंत गौरवला विहिरीत पडून दोन तास झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी गौरवला विहिरीबाहेर काढले. बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केल्यावर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक खुलताबाद यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार सावंगी येथील पो हे नवनाथ कोल्हे, विनोद बिघोद, दिलीप, बनसोड, संतोष पुंड हे करत आहेत.
गौरव हा छत्रपती संभाजीनगर वाळूज महानगर येथे पॉलिटेक्निकचे द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. दसरा सणानिमित्त आई-वडिलां भेटण्यासाठी गावाकडे आला होता. सोमवारी कॉलेज असल्याने तो जाणार होता. पण त्यापुर्वीच त्याच्यावर काळाने घाव घातला.