

Citizens caught one of the gang members who snatched two gold bangles worth four and a half tolas from an old woman and fled.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मध्यवर्ती बसस्थानकात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, पोलिसांचा धाक नसल्याने चोरांची हिम्मत वाढली आहे. रविवारी (दि.५) सायंकाळी पाचच्या सुमारास वृद्धेच्या हातातील साडेचार तोळ्यांच्या दोन सोन्याच्या बांगड्या ओरबाडून पळ काढणाऱ्या टोळीतील एकाला नागरिकांनी पकडले. सुरज सुरेश टिंगडे (३४, रा. अंबरनाथ, वेस्ट ठाणे) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून एक बांगडी जप्त केली. तर सव्वादोन तोळ्यांची बांगडी घेऊन सुमित गाडगे (रा. उल्हासनगर, ठाणे) आणि राजेश गारुंगे (रा. अंबरनाथ) हे दोघे पसार झाले.
फिर्यादी लताबाई कारभारी गायकवाड (६५, रा. कन्नड) या भाची सून अर्चना रवी आहेर सोबत पाहुण्यांना भेटून घरी परत जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात आल्या. चाळीसगाव जाणाऱ्या एसटीमध्ये चढत असताना पाठीमागून तीन आरोपी होते. लोटालोट करत चोरट्यांनी त्यांच्या हातातील बाजारमूल्यानुसार साडेचार लाख रुपये किमतीच्या साडेचार तोळ्यांच्या बांगड्या ओरबाडून घेतल्या. लताबाई यांना बांगड्या काढल्याचे कळताच त्यांनी खाली उतरून आरडाओरड केली. तेव्हा लोकांनी, सुरक्षारक्षक पकडले. त्याच्याकडून एक बांगडी हस्तगत केली.
तर अन्य दोघे एक बांगडी घेऊन पसार झाले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक उत्तम जाधव करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सुरज टिंगडे, सुमित गाडगे आणि राजेश गारुंगे हे तिघे ठाणे येथील सराईत चोरटे आहेत. हे तिघे जळगावहून संभाजीनगरला आले होते. येथून ठाण्याकडे जाताना त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकात हात मारला. मात्र सुरज नागरिकांच्या हाती लागला. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.