

Chhatrapati Sambhajinagar Paithan Dinapur Child Rescued
पैठण: पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दिनापूर या गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे जुन्या काळात धान्य साठविण्यासाठी तयार केलेल्या २० ते २५ फूट खोल पेवमध्ये ५ वर्षांचा मुलगा खेळताना अडकला. ही घटना आज (दि.२१) सकाळी घडली. दरम्यान, या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शिव राजदेव (वय ५) असे मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील दिनपूर येथील शिव राजदेव हा मुलगा धान्याच्या पेवमध्ये पडून अडकला. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत तो रडत होता. येथून जवळून जात असलेला तरूण त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून थांबला. त्याने पेव येथे जाऊन पाहिले असता मुलगा पेवमध्ये अडकल्याचे त्याच्य़ा लक्षात आले. त्याने तत्काळ याची माहिती गावातील सरपंच भीमराव कणसे व नागरिकांना दिली.
याची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेळके, बीट जमादार तांगडे घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. मुलगा अडकलेल्या पेव मध्ये गावातील तरुण तेजस बारगुजे, कैलास खाटीक दोरीच्या साह्याने उतरले. आणि अडकलेल्या मुलाला सुखरूपपणे बाहेर काढले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.