

Chhatrapati Sambhajinagar Ambelohal youth found dead
वाळूज महानगर : अंबेलोहळ- एकलहेरा रस्त्यावरील रासायनिक खताच्या गोडावून जवळ एका २२ वर्षीय तरुणाला अर्धनग्न करून बांबू, लाकडी काठी तसेच कमरेच्या बेल्टने मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. १२) सकाळी उघडकीस आली. अर्जुन रतन प्रधान (वय २२ रा. अंबेलोहळ, ता. गंगापूर, सध्या रा. साठेनगर, वाळूज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात लूटमार, चोरी, हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अंबेलोहळ येथे राहणारा अर्जुन हा गेल्या पाच-सहा महिन्यांपासून आई-वडील व एका भावासोबत वाळूज येथे राहण्यासाठी गेला होता. अंबेलोहळ येथे त्यांची शेती असल्याने अधून-मधून चक्कर मारण्यासाठी अर्जुन हा गावाकडे येत असे. आज शनिवारी सकाळी अंबेलोहळ-एकलहेरा रस्त्यावर गावापासून एक किलोमीटर अंतरावरील बाबुलाल कासलीवाल यांच्या रासायनिक खताच्या गोडावून समोर अर्जुन हा अर्धनग्न व बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आल्याने पोलीस पाटील आनंद गवळी यांनी ही माहिती पोलिसांना दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, नरेश ठाकरे, जमादार आर. एम. कोल्हे आदींनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी त्यांना अर्जुन बेशुद्ध तसेच अर्धनग्न अवस्थेत पडलेला दिसून आला. त्याच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीचे व्रण व बाजूला त्याचा शर्ट तर त्याची पॅन्ट गोडावूनच्या आवारात पडलेली तसेच घटनास्थळाजवळ बांबू, लाकडी काठी व कमरेच्या बेल्टचे तुकडे दिसून आले. सुरुवातीला मारेकऱ्यांनी अर्जुन यास गोडाऊन समोर बांबू, लाकडी काठी तसेच बेल्टने मारहाण करत त्यास गोडावून जवळील गळ्याजवळ पुन्हा मारहाण केली. तो बेशुद्ध पडल्याचे पाहून मारेकरी तेथून पसार झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. यावेळी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.