

Youth Dies Hockey Stick Attack
छत्रपती संभाजीनगर : शहरातील जुना बायजीपुरा भागातील गंजे शहीदा मशीद परिसरात मासे विक्रीचे दुकान लावण्याच्या किरकोळ वादातून टोळक्याने शाहरुख शकील खान (वय ३०) याचे हॉकी स्टिकने डोके फोडले होते. सोमवारी (दि.१५) उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेची माहिती मिळताच घाटी रुग्णालयात नातेवाइकांनी मोठी गर्दी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मासे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शाहरुखवर अक्रम (रा. चिश्तीया कॉलनी) आणि माजेद (रा. किराडपुरा) यांच्यासह अन्य दोघांनी शनिवारी (दि.६) रात्री हॉकी स्टीकने जीवघेणा हल्ला केला होता. यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेले त्याचे काका युसूफ खान यांनाही मारहाण करण्यात आली. डोक्याला गंभीर मार लागल्याने शाहरुखवर नऊ दिवसांपासून घाटीतील ट्रॉमा केअर विभागात उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी त्याची प्राणज्योत मालवली. जिन्सी पोलिसांत यापूर्वीच खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता.
तरुणाच्या मृत्यूची बातमी समजताच घाटी रुग्णालयात शेकडोंचा जमाव जमला. नातेवाईकांनी आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एसीपी मनोज पगारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळी धाव घेत मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला.
या गुन्ह्यात एकूण चार आरोपी असून, यापैकी दोन आरोपी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अशाच एका गुन्ह्यात आधीच अटकेत आहेत. तर, उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती जिन्सी ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश ताठे यांनी दिली. दरम्यान नातेवाईकांनी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. त्याची पोलिस रात्री उशिरापर्यंत समजूत घालत होते.